कथित वसुली प्रकरणात पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके यांना 7 दिवसांची CID कोठडी
X
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग आणि इतरांविरुद्ध खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपी पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाले आणि आशा कोरके यांना सात दिवसांची CID कोठडी सुनावण्यात आली आहे. कथित वसुली प्रकरणात CID ने दोघांनाही अटक केली होती. CID ने मुंबई गुन्हे शाखेत यापूर्वी तैनात असलेल्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक केली होती. या दोन्ही पोलीस अधिकारी आणि मुंबईचे परमबीर सिंग यांच्या विरोधात मरीन ड्राईव्ह पोलीसात खंडणीचा गुन्हा दाखल आहे. या दोन्ही पोलीस अधिकाऱ्यांना आज किला कोर्टात हजर करण्यात आले होते, दरम्यान सरकारी पक्षाने दोघांची 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. या दोघांनी गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाख रुपये घेतले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली होती.
खंडणी प्रकरणात अटकेत असलेल्या नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना CID ने मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात हजर केले होते. आरोपींनी पैशांचा व्यवहार केल्याचे सबळ पुरावे CID च्या हाती लागले होते. CID कडून दोन्ही आरोपींची 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. आरोपींनी तक्रारदाराकडे गुन्हा दाखल न करण्यासाठी 50 लाखांची मागणी केल्याचा आरोप आहे. यातील मुख्य आरोपी माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात नाँन बेलेबल वॉरंट जारी केलं आहे. न्यायालयाने दोन्ही पक्षाचा युक्तिवाद ऐकून आरोपींना 7 दिवसांची कोठडी सुनावली आहे.