विनापरवानगी बैलगाडा स्पर्धा, भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा
X
रायगड : रायगडमध्ये बुधवारी एका बैलगाडा शर्यतीचं आयोजन करण्यात आलं होतं. पण या बैलगाडा शर्यतीसाठी कोणतीही परवानगी घेण्यात न आल्याने आता पोलिसांनी कारवाई केली आहे. याप्रकरणी भाजपच्या पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुरुड तालुक्यातील नांदगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यती दरम्यान अपघात होवून तीन जण जखमी झाले होते. भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी शैलेश काते यांच्या वाढदिवसानिमित्त ही बैलगाडी शर्यती आयोजित करण्यात आली होती. बैलगाडी शर्यत सुरू होताच अचानक एक बैलगाडी प्रेक्षकांमध्ये घुसली त्यामुळे हा अपघात झाला. या स्पर्धेचे उद्घाटन आमदार महेंद्र दळवी, भाजपा जिल्हा अध्यक्ष ॲड महेश मोहिते, काँग्रेसचे नेते राजेंद्र ठाकूर यांच्या उपस्थित करण्यात आले होते. याच स्पर्धेदरम्यान आणखी एका बैलगाडीचे बैल उधळले व सैरावैरा पळू लागल्याने बैलगाडी मालक जखमी झाला. या घटनेमुळे बैलगाडा स्पर्धेच्या आय़ोजनात प्रेक्षक आणि बैलगाडा मालक यांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना करण्याची गरज अधोरेखित झाली आहे.
दरम्यान जिल्हाअधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत आयोजक शैलेश काते आणि इतर आठ तर दहा बैलगाडी धारक यांच्याविरोधात मुरूड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थितीत कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे या नियमांचा भंग करत कोरोना संसर्ग विषाणूचा प्रसार होण्याचा संभव असताना देखील कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता ही स्पर्धा आयोगित करण्यात आली होती, असा ठपका ठेवण्यात आला आहे.