मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर, ममता बॅनर्जी उपस्थित राहणार का?
X
पश्चिम बंगालमध्ये भाजप विरुद्ध ममता बॅनर्जी असा संघर्ष रंगलेला असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. विशेष बाब म्हणजे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा दिल्ली पोहोचून 24 तास पूर्ण होत नाही तेव्हाच पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगालच्या दौऱ्यावर जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी आसामहून हल्दिया या ठिकाणी पोहोचणार आहेत.
या ठिकाणी त्यांच्या हस्ते बीपीसीएल ने तयार केलेल्या एलपीजी इंपोर्ट टर्मिनल चं उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोभी-दुर्गापुर नॅचरल गॅस पाइपलाइन सेक्शनचं देखील उद्घाटन होणार आहे. या संदर्भात मोदी यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे.
हे दोनही कार्यक्रम सरकारी असल्यानं संबंधित राज्यातील मुख्यमंत्र्यांना या कार्यक्रमाला सरकारी नियमानुसार आमंत्रित करावं लागते. मात्र, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कार्यालयाने ममता बॅनर्जी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार नसल्याचं समजतंय.
काय आहे कारण?
पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजप आणि ममता बॅनर्जी एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. त्यातच गेल्या 15 दिवसांपुर्वी नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ममता बॅनर्जी एकाच मंचावर आले होते. यावेळी ममता बॅनर्जी बोलण्यास उभ्या राहिल्या असता जय श्रीरामचे नारे लगावले गेले होते. यानंतर मात्र ममता दीदींचा पारा वाढला. त्यांनी माईकवर येऊन "शासकीय कार्यक्रमांची प्रतिष्ठा राखली गेली पाहिजे आणि त्यासाठी आचारसंहिता असते. हा काही राजकीय कार्यक्रम नाही" या शब्दात आपला संताप व्यक्त केला. एवढेच नाहीतर प्रमुख पाहुणे म्हणून बोलवायचे आणि अपमानित करायचे हे चांगले नाही, असे म्हणत या अपमानाचा निषेध म्हणून आपण भाषण करणार नाही, असे जाहीर करत त्यांनी आपली नाराजी थेट पंतप्रधान मोदींसमोरच व्यक्त केली होती.
पंतप्रधानांची पहिली प्रचार सभा...
पश्चिम बंगालच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीकोनातून मोदी आज पश्चिम बंगालमध्ये त्यांची पहिली सभा घेतील. या सभेत लाखभर लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या सभेत मोदी ममता सरकारवरच्या कारभारावर काय बोलतात? हे पाहणं महत्त्वाचं आहे.