Bhandara Hospital fire: राष्ट्रपती, पंतप्रधान यांचं ट्विट, मुख्यमंत्र्यांचे तातडीने चौकशीचे आदेश
X
भंडारा शासकीय रुग्णालयातील नवजात शिशू केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत. तर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांनी या घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भंडारा येथे लागलेल्या आगीत लहान बालकांचा मृत्यू झाल्यानं आपल्याला दु:ख झाल्याचं ट्विट केलं असून ज्या परिवारातील बालकांचा मृत्यू झाला आहे. त्या परिवाराबाबत संवेदना व्यक्त केल्या आहेत.
तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील या घटनेबाबत ट्विट करत दु:ख व्यक्त केलं आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भंडारा येथील लागलेल्या आगी बाबत शोक व्यक्त करताना भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता नवजात केयर युनिटमध्ये (SNCU) आग लागल्यामुळे दहा बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुर्दैवी आणि मन हेलावणारी आहे. ज्या कुटुंबांतील मुलांचा या घटनेत मृत्यू झाला त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो हीच प्रार्थना. असं ट्विट गडकरी यांनी केलं आहे.
दरम्यान रात्री दोन च्या सुमारास ही आग लागली होती. या आगीच्या धुरामुळे गुदमरून लहान बालकांचा मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी ही घटना कळताच आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी बोलून या संपूर्ण घटनेची तात्काळ चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री हे जिल्हाधिकारी तसेच पोलिस अधीक्षक यांच्याशी देखील बोलले असून त्यांनाही तपासाचे निर्देश देण्यात आले आहेत.
कर्तव्यावर असणाऱ्या नर्स ने शिशू केअर युनिट मधून येत असलेल्या धुराबाबत हॉस्पिटलच्या इतर स्टाफला कळवले. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी तात्काळ इथल्या बालकांना बाहेर काढले. शिशू केअर युनिटमधील सात बालकांना वाचवण्यात यश आलं. मात्र आऊटबॉर्न युनिटमधल्या 10 बालकांचा मृत्यू झाला आहे.
याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी बोलताना अशा घटना पुन्हा घडणार नाहीत याची काळजी घेतली जाईल. तसेच या घटनेतील मृत बालकांच्या कुटुंबियांना सरकारकडून मदत केली जाईल. लवकरच रुग्णालयात जाऊन मी स्वत: पाहणी करेन असं सांगितलं.
कॉंग्रेस नेते राहूल गांधी यांनी देखील भंडारा येथील नवजात बालकांच्या दुर्दैवी मृत्यू बाबत दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच महाराष्ट्र सरकारला आवश्यक ती सर्व मदत पुरवण्याची विनंती त्यांनी केली आहे.