Pegasus वरुन वाद, मात्र इस्त्रायलला पंतप्रधान मोदी यांचा खास संदेश
एकीकडे Pegasus वरून वाद सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्राईलला संदेश दिला आहे.
X
Pegasus स्पायवेअरवरुन एकीकडे द न्यूयॉर्क टाईम्सने मोठा गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१७मधील आपल्या इस्त्रायल दौऱ्यात Pegasus खरेदीचा करार केला होता, असे वृत्त न्यूयॉर्क टाईम्सने दिले आहे. यानंतर विरोधकांनी मोदी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच येत्या बजेट अधिवेशनात मोदी सरकारला यावरुन घेरणार असल्याचेही सांगितले आहे. या दरम्यान सरकारकडून मात्र याबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आलेले नाही. शनिवारी दिवसभर या मुद्द्यावरुन दिल्लीमधील वातावरण तापले होते.
पण रात्री ८ वाजताच्या सुमारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इस्त्रायलसाठी खास संदेश देणारा व्हिडिओ ट्वीट केला आहे. यामध्ये त्यांनी इस्त्रायलशी भारताने अधिकृतपणे राजनैतिक संबंध प्रस्थापित कऱण्यास तीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त इस्त्रायलला मैत्रीचा संदेश दिला आहे. "आजचा दिवस आपल्या संबंधांच्या बाबतीत महत्त्वाचा आहे. तीस वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी भारत आणि इस्त्रायल दरम्यान राजनैतिक संबंध प्रस्थापित झाले होते. दोन्ही देशांमध्ये एका नवीन अध्यायाची सुरूवात झाली होती. भलेही अध्याय नवीन होता, पण आपल्या दोन्ही देशांचा इतिहास खूप जुना आहे. आपल्या लोकांमध्ये अनेक शतकांपासून घनिष्ठ नाते राहिले आहे. शेकडो वर्षांपासून यहुदी समुदाय भारताशी एकनिष्ठ राहिला आहे, भारताच्या विकासात योगदान दिले आहे. बदलत्या काळात भारत आणि इस्त्रायल यांचे संबंध आणखी दृढ करण्याची हीच वेळ आहे. " असे मोदी यांनी संदेशात म्हटले आहे. त्याचबरोबर भारत आणि इस्त्रायल मैत्री येत्या काळात आणखी दृढ होत जाईल असेही मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
My message on the 30th anniversary of India-Israel full diplomatic relations. https://t.co/86aRvTYCjQ
— Narendra Modi (@narendramodi) January 29, 2022