Home > News Update > थरारक : पुरात अडकलेल्या दोघांचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी वाचविले प्राण

थरारक : पुरात अडकलेल्या दोघांचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी वाचविले प्राण

भोकर तालुक्यातील जामदरी येथे पुरात अडकलेल्या दोघा तरूणांचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी प्राण वाचविले. हा संपुर्ण थरारक प्रकार स्थानिकांनी मोबाईल कॅमेरात कैद केला आहे.

थरारक : पुरात अडकलेल्या दोघांचे उपजिल्हाधिकाऱ्यांनी वाचविले प्राण
X

नांदेड // भोकर तालुक्यातील जामदरी येथील जनावरे चारण्यास गेलेले दोन तरुण पुरामुळे नदीच्या मध्यभागी अडकून पडले होते, या घटनेची माहिती मिळताच भोकरचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी घटनास्थळी दाखल झाले. स्वत:च्या जीवाची पर्वा न करता त्यांनी रात्री 12 वाजता थेट पुराच्या पाण्यात उतरून दोरीच्या साहाय्याने त्या तरुणांना बाहेर काढले. उपविभागीय अधिकारी खंदारे यांच्यामुळेच या दोन तरूणांचे जीव वाचल्याने त्यांच्या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

धम्मपाल संजय कसबे व अर्जुन साईनाथ तमलवाड असे प्राण वाचलेल्या दोन तरुणांची नावे आहेत. भोकर तालुक्यातील जामदरी येथील हे तरूण असून हे दोघे तरुण जामदरी शिवारात नदीच्या पलीकडे जनावरे चारण्यास गेले होते, दुपारच्या सुमारास अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे नदीची पाण्याची पातळी अचानक वाढली. सायंकाळपर्यंत नदीला पूर आला ,घाबरलेल्या अवस्थेत या दोघा तरुणांनी आपल्या आईवडिलांना फोनवरून ही माहिती दिली. तेंव्हा गावातील लोकांनी महसूल प्रशासनाला माहिती देत तरूणांच्या मदतीसाठी धाव घेतली.

उपविभागीय अधिकारी राजेंद्र खंदारे यांनी व्यवस्थापन पथकाला पाचारण करत स्वत: या तरूणांचा जीव वाचवला आहे. दरम्यान राज्यभर सर्वदुर मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी पुरस्थिती आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून केले जात आहे.

Updated : 25 July 2021 7:17 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top