पोलीस निरीक्षकाला हवा पिस्तुल परवाना, परमबीर सिंहांपासून धोक्याचा दावा...
X
खंडणीच्या विविध तक्रारी दाखल झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. परमबीर सिंह यांच्यापासून आपल्या जीवाला धोका आहे, असा गंभीर आरोप पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी केला आहे. तसेच परमविर सिंह आणि त्यांच्या काही लोकांकडून जीवाला धोका असल्यामुळे आपल्याला स्वसंरक्षणासाठी पिस्तुल परवाना देण्यात यावा, अशी मागणी करणारा अर्ज अनुप डांगे यांनी सादर केला आहे.
पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी पोलीस खात्याकडे रिव्हॉल्वरचा परवाना मागितला आहे, आपल्याला व कुटुंबाच्या जीवाला माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग व त्यांच्या हस्तकाकडून धोका असल्याची तक्रारही त्यांनी केली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात सर्वप्रथम लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी तक्रार केली आहे. गेल्या दोन आठवड्यात दोन तक्रारी त्यांनी माजी आयुक्त परमबीर सिंग यांच्या विरोधात दिल्या आहेत.
पहिल्या तक्रारीत परमबीर सिंग व त्यांचे हस्तक हे आपल्या केसमधील साक्षीदार व तपास अधिकारी यांच्यावर दबाव आणीत असून आपल्यावय पाळत ठेवली जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. दुसऱ्या तक्रारीत आपल्याला व आपल्या कुटुंबाला परमबीर सिंग व त्यांच्या हस्तकाकडून जीवाला धोका असून रिव्हॉल्वरचा परवाना मिळावा अशी मागणी त्यांनी केली आहे. या तक्रारीत पीआय अनुप डांगे यांनी म्हटले आहे की, आपण पोलीस खात्यात छोटा राजन व अंडरवर्ल्डच्या इतर गुंडांच्या विरोधात धडक कारवाई केली. तसेच त्यांच्यावर पोलीस विभागाचा वचक बसवण्यासाठी काम करीत असताना तत्कालीन उच्च पोलीस अधिकारी अरुण पटनाईक यांनी स्वरक्षणासाठी पोलीस विभागातर्फे आपल्याला रिव्हॉल्वर दिली होती.
मात्र आता आपल्याला पोलीस विभागातील एक बडा पोलीस अधिकारी ज्याचे अंडर वर्ल्डसोबत संबंध आहेत, त्याच्यापासून आपल्याला व आपल्या कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी रिव्हॉल्वरचा परवाना मागण्याची वेळ आली आहे, असे डांगे यांनी म्हटले आहे. खंडणी मागण्याच्या गुन्ह्यांसह परमबीर सिंह यांच्याविरोधात आता आणखी एक गंभीर तक्रार दाखल झाली आहे. त्यामुळे येत्या काळात परमबीर सिंह यांच्यावर काय कारवाई होते, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.