'फुले आंबेडकरी वाङ्मयकोशाचे' सोमवारी मुंबईत प्रकाशन
X
प्रारंभापासून ते २०२२ पर्यंतच्या ५६० दलित साहित्यिकांचा १४३५ पृष्ठांचा वाङ्मयकोश
'फुले आंबेडकरी वाङ्मयकोश' या दलित साहित्याच्या दृष्टिने अत्यंत महत्त्वाच्या कोशग्रंथाचे प्रकाशन प्रख्यात विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सोमवारी मुंबईत होणार आहे. मुंबई प्रेस क्लब येथे सायंकाळी ५.३० वाजता होणाऱ्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रख्यात साहित्यिक अर्जुन डांगळे आहेत. प्रसिद्ध समिक्षक डॉ. अनंत देशमुख आणि महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ. मिनाक्षी पाटील या कोशग्रंथाबद्दल बोलणार आहेत.
१९६० च्या दरम्यान उदयाला आलेल्या दलित साहित्याने सहा साडे सहा दशकांचा कालखंड पूर्ण केला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ, त्यांनी सुरु केलेली वृत्तपत्रे, त्या वृत्तपत्रांतून प्रकाशित झालेले साहित्य, आंबेडकरी जलसे, आंबेडकरी लोकगीते आणि दलित साहित्य व या साहित्याचा झालेला विकास ही या देशातील ऐतिहासिक घटना आहे. याला महात्मा फुल्यांपासूनचा वारसा आहे. त्यांचे एकूण साहित्य आणि समाजकार्याने ही समग्र चळवळ प्रभावित झालेली आहे. हा इतिहास समाजाला, विद्यार्थी, संशोधक आणि अभ्यासकांना अवगत व्हावा यासाठी “फुले आंबेडकरी वाङमय कोश” निर्माण करण्यात आला आहे. तब्बल १४३५ पृष्ठांच्या या कोशात आंबेडकरपूर्व, आंबेडकरकालीन आणि आंबेडकरोत्तर अशा तिन्ही कालखंडातील सुमारे ५६० लेखक, त्यांचे साहित्यातील योगदान व साहित्याचे महत्व अधोरेखित करण्यात आले आहे.
प्रसिद्ध दलित साहित्यिक डॉ. महेंद्र भवरे हे या ग्रंथाचे मुख्य संपादक असून सर्वश्री डॉ. अशोक इंगळे, राम दोतोंडे, डॉ. सुनील अवचार, डॉ. मच्छिंद्र चोरमारे, डॉ. अशोक नारनवरे, डॉ. प्रकाश मोगले, डॉ. भास्कर पाटील, पंडित कांबळे, प्रा. ज्ञानेश्वर कांबळे यांच्या संपादक मंडळाने हा ग्रंथ सिध्द केलेला आहे.
कोश वाङमय प्रसिद्ध करण्याचा लौकिक असलेल्या पुण्याच्या डायमंड प्रकाशनाने हा कोश प्रसिद्ध केला आहे. हा त्यांचा ३९ वा कोशग्रंथ आहे.