फोन टॅपिंगवरून आत्ता सत्ताधारी व विरोधकांमध्ये तू तू मै मै
X
सचिन वाझे, परमबीर सिंह लेटर बॉंम्ब नंतर आता सत्ताधारी आणि विरोधकांमधील वादाचा मुद्दा फोन टँपिंग वर येऊन ठेपला असून आघाडी सरकारच्या वतीने आता गुन्हा दाखल करण्याची कारवाई करण्यात आली असून विरोधी पक्षाने हा अहवाल सत्ताधारी मंत्र्यांनीच फोडल्याचा आरोप केला आहे. फोन टॅपिंग आणि वरिष्ठ पोलीस अधिकारयांच्या कथित बदल्यांचा गोपनीय अहवाल फुटलाच कसा याचा आता मुंबई पोलीस तपास करणार आहेत. गोपनीय पत्र व इतर तांत्रिक माहिती बेकायदेशीरपणे घेऊन ती 'लीक केल्याप्रकरणी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या वतीने दिलेल्या तक्रारीवरून मुंबई सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल देखील करण्यात आला आहे.
राज्य गुप्तवार्ता विभागाच्या तत्कालीन आयुक्त रश्मी शुक्ला यांनी गेल्या वर्षी बेकायदेशीरपणे फोन टॅपिंग करून त्याचा अहवाल तसेच वरिष्ठ अधिकारयांच्या बदल्यांचा गैरव्यवहार झाल्याचा अहवाल पोलीस महासंचालकांकडे दिला होता. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलताना तो अहवाल तसेच राज्य गुप्तवार्ता विभागातील त्यासंबंधीचा तांत्रिक अहवाल आपल्याकडे पेन ड्राइव्हमध्ये असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राज्य गुप्तवार्ता विभागाचा गोपनीय अहवाल तसेच गोपनीय तांत्रिक माहिती त्या विभागातून बाहेर आलीच कशी? हा गोपनीय अहवाल कोणी काढून घेतला याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.
या प्रकरणी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पडसाद उमटल्यानंतर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी रश्मी शुक्लांवर ठपका ठेवणारा अहवाल राज्य सरकारला सादर केला आहे. त्यावर बचावात्मक भूमिकेत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मी फक्त अहवालातील पत्राची दोन पाने प्रसारमाध्यमांना दिली होती. अहवाल सीलबंद करून पेनड्राइव्हच्या माध्यमातून केंद्रीय गृहसचिवांना सादर केला आहे. अहवाल सत्ताधारी मंत्री नवाब मलिक यांनी फोडल्याचा आरोप त्यांनी केला होता. मुख्य सचिव सीताराम कुंटे हे सरळमार्गी गृहस्थ असून या अहवालाचे लेखन जितेंद्र आव्हाड किंवा नवाब मलिक या मंत्र्यांनी केल्याचा विरोधकांचा आरोप आहे.
गोपनीय अहवाल अशा प्रकारे चोरून तो सार्वजनिक करणे गुन्हा असल्याने त्याची राज्य गुप्तवार्ता विभागाने गंभीर दखल घेत तक्रार दिल्यानंतर मुंबई सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरोधात कलम 30 भारतीय टेलिग्राम अँक्ट 1885, माहिती-तंत्रज्ञान कायदा 2008 कलम 43 (ब), 66 सह द ऑफिशियल सिक्रेट अँक्ट 1923 च्या कलम 5 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकंदरीत सचिन वाझे प्रकरणावरून सुरू झालेली ही राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका अंटालिया मार्गे पररमसिंह लेटरबॉम्ब ते फो टँपिंग पर्यंत येऊन पोहोचली आहे.