पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची घोडदौड सुरूच; पेट्रोल- डिझेलच्या किंमतीत 35 पैशांची वाढ
X
देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीची घोडदौड सुरूच आहे. इंधन दर रोज नवनवे उच्चांक गाठत आहे. शुक्रवारी भारतीय पेट्रोलियम कंपन्यांकडून इंधनाच्या दरात पुन्हा एकदा वाढ करण्यात आली. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. हे दर आज दिवसभर लागू असणार आहे.
या नवीन दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 112.78 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलचा दर 103.63 रुपये आहे. दिल्लीत पेट्रोल दर 106.89 तर डिझेलचा दर 95.62 रुपये इतका आहे. इंधनाची दरवाढ अशीच सुरु राहिल्यास पेट्रोल लवकरच 120 रुपये प्रतिलीटर होईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
कच्च्या तेलाचे दर सात वर्षांतील उच्चांकी पातळीवर पोहचले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सध्या NYME क्रूडचा दर 80 डॉलर्स प्रतिबॅरलच्या जवळपास आहे. हा गेल्या सात वर्षांतील उच्चांकी दर आहे. कोरोनाने खनिज तेलाचे कमी झालेले उत्पादन तातडीने वाढवणे शक्य नाही. त्यामुळे डिसेंबर महिन्यापर्यंत ब्रेंट क्रूड 90 डॉलर्स प्रतिबॅरलची पातळी गाठेल, असा अंदाज व्यक्त होत आहे.
दरम्यान या दरवाढीचा फटका जसा सर्वसामान्यांना बसला आहे तसा पुण्यातील PMPML बस सेवेला देखील बसला आहे. आधीच कोरोना संकटाने रडतखडत सुरु असलेल्या पुण्यातील PMPML बस सेवेला आता इंधन दरवाढीचा मोठा फटका बसताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत प्रचंड वाढ झाली आहे. डिझेलची किंमत वाढल्याने PMPML ची संचलन तूट तब्बल 600 ते 700 कोटी इतकी होण्याचा अंदाज व्यल्ट होत आहे. गेल्यावर्षी ही तूट 497 कोटी होती. मात्र, यंदा पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी या तिन्ही इंधनांच्या दरात वाढ झाल्याने वित्तीय तुटीचा आकडा वाढला आहे.