Pervez Musharraf : लष्करशहा ते पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष
X
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष जनरल परवेज मुशर्रफ यांचं वयाच्या ७९ वर्षी दीर्घ आजारानं निधन झालंय. संयुक्त अरब अमिरातीतल्या एका अमेरिकन रूग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील कित्येक वर्षांपासून मुशर्रफ हे विजनवासात होते. त्यांच्या जीवनप्रवासाचा वेध घेणारा हा स्पेशल रिपोर्ट...
एका दुर्धर आजारामुळं मुशर्रफ यांचे एक-एक अवयव निकामी होत चालले होते. त्यांना amyloidosis हा आजार जडला होता. मुशर्रफ आणि वाद हे समीकरणच झालं होतं. २००७ मध्ये माजी पंतप्रधान बेनझीर भुत्तो (Benazir Bhutto) यांच्या हत्येचा मुशर्रफ यांच्यावर आरोप होता. त्यानंतर मागील ८ वर्षांपासून मुशर्रफ हे दुबईत राहत होते. मात्र, आयुष्यातील उर्वरित वेळ हा पाकिस्तानमध्ये व्यतीत करण्याची मुशर्रफ यांची इच्छा होती, त्यामुळं त्यांना पाकिस्तानात लवकरात लवकर परतायचं होतं.
मुशर्रफ हे पाकिस्तानचे दहावे राष्ट्राध्यक्ष होते. सैन्यात असतांना मुशर्रफ यांनी ज्वाईंट चीफ ऑफ स्टाफ कमिटी ऑफ पाकिस्तान (CJCSC) हे पद १९९८ ते २००१ पर्यंत भुषवलं होतं. त्यानंतर सैन्याचे ७ वे जनरल म्हणून त्यांनी १९९८ ते २००७ पर्यंत कामं पाहिलं होतं.
जनरल परवेज मुशर्रफ यांना कारगिल युद्धासाठी जबाबदार धरण्यात आलं होतं. मुशर्रफ यांनी त्याच्या सैनिकांना श्रीनगर मधील लेह परिसर भारतापासून विभक्त करण्याचे आदेश दिले होते. १९९९ च्या उन्हाळ्यात कारगिलचे युद्ध झाले होते. मात्र, मुशर्रफ यांनी नेतृत्व करूनही भारतीय सैन्यापुढे पाकिस्तानच्या सैन्य टिकू शकले नाही. मुशर्रफ यांची युद्धनिती फसल्याची चर्चा त्यावेळी झाली होती. कारगिल युद्धानंतर मुशर्रफ पूर्वीपेक्षा अधिक सक्षम झाले होते.
परवेज मुशर्रफ हे १९९९ मध्ये श्रीलंकेच्या दौ-यावर असतांना त्यांना पाकिस्तानमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणा-या नवाज शरीफ यांना अटक करून तुरूंगात टाकण्यात आलं. त्यानंतर मुशर्रफ यांनी १९९९ मध्येच स्वतःला पाकिस्तानचा राष्ट्राध्यक्ष घोषित करून टाकलं.
त्यानंतर पाकिस्तानमध्ये सात वर्षे मुशर्रफ यांच्या हुकूमशाहीचं राज्य होतं. त्या दरम्यानच जुलै २००१ मध्ये मुशर्फ भारतातही आले होते. मुशर्रफ यांचा जन्म १९४३ मध्ये नवी दिल्ली इथं झाला होता. मात्र, त्यानंतर झालेल्या फाळणीमध्ये मुशर्रफ यांच्या पालकांनी नव्यानं निर्माण झालेल्या पाकिस्तानमध्ये स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. मुशर्रफ यांच्या वडिलांनी पाकिस्तान सरकारमध्ये विदेश मंत्री म्हणून काम पाहिलं होतं. मुशर्रफ यांची आई शिक्षिका होती. मुशर्रफ कुटुंबिय कट्टर इस्लामचे अनुयायी होते.
वयाच्या अवघ्या १८ व्या वर्षी परवेज मुशर्रफ सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी सैन्यात अनेक तुकड्यांचं प्रतिनिधीत्व केलं होतं. कालांतरानं मुशर्रफ सैन्याचे प्रमुख झाले. पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यापेक्षा मुशर्रफ हे तेव्हा सर्वात शक्तीशाली होते. मुशर्रफ यांच्या अनेक रणनितींना नवाज शरीफ यांनी विरोध केला होता.
९ मार्च २००७ मध्ये मुशर्रफ यांनी पाकिस्तानचे तत्कालीन मुख्य न्यायाधीश इफ्तेखार मुहम्मद चौधरी यांना बेकायदेशीररित्या निलंबित केलं होतं. याविरोधात रस्त्यावर मोठा राजकीय संघर्ष निर्माण झाला होता. त्यावेळी २००८ मध्ये पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणूका होता, त्यामुळं मुशर्ऱफ यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून पायऊतार होण्यासाठी त्यांच्यावर राजकीय दबाव वाढू लागला होता. त्याचवर्षी २६/११ हल्ला झाला आणि भारत-पाकिस्तानचे संबंध आणखी ताणले गेले. त्यानंतर न्यायाधीशांना अटक प्रकरणात मुशर्र्फ यांनाच अटक करण्यात आली. अटकेनंतर मुशर्रफ यांना घरातच ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या राज्यघटनेची पायमल्ली केल्याचाही आरोप होता. त्यामुळं त्यांना पाकिस्तान सोडून अन्य ठिकाणी जाण्यास निर्बंध टाकण्यात आले होते. मात्र, मार्च २०१६ मध्ये त्यांच्यावरील हे निर्बध उठविण्यात आले, त्यामुळं मुशर्रफ हे दुबईत स्थायिक झाले.
डिसेंबर २०१९ मध्ये पाकिस्तानच्या विशेष न्यायालयानं जनरल परवेज मुशर्र्फ यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पाकिस्तानची राज्यघटना २००७ मध्ये बरखास्त केल्याप्रकरणी ही शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, दुबई आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये गुन्हेगार हस्तांतरणाचा करार नव्हता, त्यामुळं मुशर्रफ यांना पकडता आले नाही.
पाकिस्तानच्या विशेष न्यायालयानं सुनावलेल्या शिक्षेला जानेवारी २०२० मध्ये मुशर्र्फ यांनी लाहोरच्या उच्च न्यायालया आव्हान दिलं होतं. दरम्यान, त्याची सुनावणी होण्याआधीच मुशर्रफ यांनी जगाचा निरोप घेतला.