मुठभर मातीसाठी कोरोना रुग्णाची मृत्यूनंतरही परवड
कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्यासाठी अडचणी येत असल्याचे अनेक प्रकार घडत आहेत. पण कल्याणमध्ये एका व्यक्तीच्या दफनविधीसाठी तब्बल 4 तास मृतदेह घेऊन फिरण्याची वेळ त्यांच्या शेजाऱ्यांवर आली आहे.
X
कल्याण : कल्याणमध्ये एका कोरोनाबाधित व्यक्तीची मृत्यूनंतरही परवड संपलेली नाही. या व्यक्तीच्या दफनविधीसाठी शेजाऱ्यांना चार तास वणवण फिरावे लागले, त्या परिसरातील कारण एकही कब्रस्तान दफनविधी करण्यास तयार नव्हते. अखेर प्रसार माध्यमांनी यासंदर्भातले वृत्त दाखवताच एका कब्रस्तानने त्यांच्या पार्थिवावर दफनविधी करण्याची तयार दाखवली. कल्याणच्या वालधूनी परिसरात राहणारी एक व्यक्ती काही महिन्यापासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होती. त्याच्यावर उपचार सुरु होते. त्याची पत्नी आणि चार वर्षाचा मुलगा असा त्याचा परिवार आहे. रात्री त्याला जास्त त्रास झाल्याने त्याची पत्नी त्याला रुक्मीणीबाई रुग्णालयात उपचारासाठी घेऊन आली. त्यावेळी त्याची अॅन्टीजेन टेस्ट करण्यात आली. पण या दरम्यान त्या रुग्णाचा मृत्यू झाला. पण त्यानंतर त्याचा कोविड टेस्ट रिपार्ट पॉझीटीव्ह आला. दरम्यान अंत्यविधीसाठी त्याचा मृतदेह स्मशानभूमीत नेण्यात आला. पण रुग्ण मुस्लीम असल्याचे लक्षात येताच तो मृतदेह कब्रस्तानमध्ये नेण्यात आला. मृतदेह घेऊन दफनविधीसाठी तीन कब्रस्तान फिरले. चार तास त्यांचे शेजारी नासीर आणि त्याचे मित्र मृतदेह घेऊन फिरत होते. पण त्यांना कब्रस्तानमध्ये जागा मिळत नव्हती. पण अखेर शहाड येथील एका कब्रस्तानने त्या व्यक्तिच्या मृतदेहावर दफनविधी करण्याची तयारी दाखविली.