Home > News Update > #PegasusSnoopgate- एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींवरही ठेवली गेली पाळत

#PegasusSnoopgate- एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींवरही ठेवली गेली पाळत

#PegasusSnoopgate- एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींवरही ठेवली गेली पाळत
X

एल्गार परिषद प्रकरणी अटक झालेल्या 8 जणांचे 9 फोन नंबर पिगॅसस स्पायवेअरचा वापर करणाऱ्या NSOच्या लिक झालेल्या डाटा बेसमध्ये आढळले आहेत, अशी माहिती द वायरने आपल्या वृत्तात दिली आहे. या प्रकरणी सध्या अटकेत असलेल्या प्रा.हनी बाबू आणि रोना विल्सन यांच्यावर फोनद्वारे 2017मध्ये पिगॅसस स्पायवेअऱ द्वारे पाळत ठेवण्यात आली होती. त्यानंतर 6 जून 2018 रोजी कैद्यांच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या रोना विल्सन यांना एल्गार परिषद प्रकरणी मुख्य आरोपी म्हणून अटक करण्यात आली. तसेच जुलै 2020मध्ये हनी बाबू यांना NIAने याच प्रकरणात अटक केली.

हनी बाबू आणि रोना विल्सन यांच्या व्यतिरिक्त या पिगॅसस स्पायवेअर तयार करणाऱ्या NSO कंपनीच्या लिक झालेल्या यादीत आनंद तेलतुंबडे, वर्नन गोन्साल्विस, गौतम नवलखा, अरुण फेरीरा आणि सुधा भारद्वाज यांचेही नंबर आहेत. या प्रकरणात आतापर्यंत 16 सामाजिक कार्यकर्ते, मानवी हक्क कार्यकर्ते आणि शिक्षणतज्ज्ञांना अटक करण्यात आली आहे. याच आरोपींपैकी एक असलेल्या 84 वर्षांच्या स्टॅनम स्वामी यांचे 5 जुलै रोजी निधन झाले. जामीन मिळण्यासाठी त्यांचा अखेरपर्यंत संघर्ष सुरू होता.

फ्रान्समधील Forbidden Stories, आणि Amnesty International's Security Lab ने द वायरसह जगभरातील काही वृत्त माध्यमांना ही माहिती दिली आहे. एल्गार परिषद प्रकरणातील या आरोपींसह त्यांचे काही नातेवाईक, मित्र यांचेही सुमारे 12 नंबर या यादीमध्ये आढळले आहेत. या सर्वांचे नंबर आणि त्यांची नावे द वायरने तपासून घेतली आहेत. 2018 ते 2020 दरम्यान या सगळ्यांची पुणे पोलीस आणि नंतर NIAने चौकशी केली आहे, असेही या वृत्तामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.

लिक झालेल्या माहितीमध्ये तेलगू कवी वरावरा राव यांची मुलगी पवना, वकील सुरेंद्र गडलिंग यांच्या पत्नी मीनल गडलिंग, त्यांचे सहकारी वकील निहालसिंग राठोड, जगदीश मेश्राम आणि मारुती कुरवाटकर यांचे नंबरही या यादीत आहे. कुरवाटकर यांना UAPA कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती. 4 वर्षांनंतर त्यांची जामिनावर सुटका झाली होती. या यादीमध्ये 2018च्या मध्यावर हे सर्व नंबर पाळत ठेवण्यासाठी घेण्यात आले होते. तर एल्गार परिषद प्रकरणाशी संबंधित घटनांच्या आसपास काही फोन नंबरवर पाळत ठेवली गेल्याचे दिसते आहे. उदा. वरवरा राव यांना घरीच नजरकैदेत ठेवण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले, तेव्हाच त्यांच्या मुलीचा फोन नंबर पाळत ठेवण्याच्या यादीत आल्याचे दिसते. सुधा भारद्वाज, वर्नन गोन्साल्विस, सेन आणि फेरीरा यांचे फोन नंबर त्यांच्या अटकेच्या अनेक महिन्यांनंतरही या यादीतमध्ये होते.

सुधा भारद्वाज यांना ऑगस्ट 2018मध्ये अटक करण्यात आली आणि 26 ऑक्टोबर 2018 रोजी त्यांनी तुरुंगात टाकण्यात आले. पण त्यानंतरही त्यांच्यी फोनवर पाळत ठेवली गेल्याचे या डाटावरुन दिसते. खरे तर एखाद्या आरोपीला अटक केल्यानंतर आणि तुरुंगात टाकल्यानंतर त्या व्यक्तीचा फोन स्वीच ऑफ केला जातो, कारण हा इलेक्ट्रॉनिक पुरावा असतो आणि त्यात छेडछाड केली जाऊ शकते. या माहितीवरुन त्यांच्या अटकेनंतरही त्यांचा फोन हॅक झाला होता का, अशी शक्यता आहे. सुरेंद्र गडलिंग यांच्या अटकेनंतर त्यांच्या पत्नी मिनल यांचा नंबर एक महिन्याने या यादीत आला.

आपल्या पतीच्या कामाची आपल्याला माहिती होती, पण आपण त्यात कधीही सहभागी नव्हतो. "मी सार्वजनिक जीवनात क्वचित वावरते, त्यामुळे मला यात का लक्ष्य केले गेले" असा सवाल मिनल यांनी द वायरशी बोलताना केला आहे.

दरम्यान डिजिटल फर्म आर्सेनल कन्सल्टिंगने सुरेंद्र गडलिंग यांच्या लॅपटॉपमध्ये घुसखोरी करुन काही माहिती टाकली गेल्याचा दावा केला आहे. जवळपास 20 महिने हा प्रकार सुरू होता, असा दावाही आर्सेनल कन्सल्टिंग कंपनीने केला आहे. तसेच रोना विल्सन यांच्या लॅपटॉपमध्येही त्यांच्या अटकेच्या 22 महिने आधी घुसखोरी केली गेल्याचा दावाही या कंपनीने फेब्रुवारीमध्ये केला होता.

त्यामुळे भीमा कोरेगाव आणि एल्गार परिषद प्रकरणात या सर्व आऱोपींनी गोवण्यात आले, असा जो आरोप होतो आहे, त्याची चौकशी करण्याची मागणी आता जोर धरु लागली आहे.

Updated : 20 July 2021 4:16 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top