Home > News Update > Parliament Monsoon Session 2023 : AAP चे खासदार संजय सिंह निलंबित

Parliament Monsoon Session 2023 : AAP चे खासदार संजय सिंह निलंबित

Parliament Monsoon Session 2023 : AAP चे खासदार संजय सिंह निलंबित
X

मणिपूर हिंसाचारप्रकरणी आज संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी राज्यसभेत चर्चेची मागणी केली. यावेळी सभापती जगदीप धनखड आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांच्या मणिपूरच्या मुद्द्यावरून जोरदार खडाजंगी झाली. त्याचवेळी आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी देखील मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चेची जोरदार मागणी केली. त्यामुळं कामकाजात अडथळा आणल्याच्या कारणामुळं आप चे खासदार संजय सिंह यांच्याविरोधात सभापती धनखड यांनी निलंबनाची कारवाई केलीय.

राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी कामकाज सुरू असतांना आप चे खासदार संजय सिंह हे वारंवार मणिपूर प्रश्नी चर्चेची मागणी करत होते. खासदार सिंह यांना सभापती धनखड यांनी अनेकदा इशारा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, खासदार सिंह चर्चेच्या मागणीवर ठाम राहिले. त्यामुळं अखेर सभापती धनखड यांनी आपचे खासदार संजय सिंह यांना पावसाळी अधिवेशनापुरतं निलंबित करण्याचा निर्णय घेतला. केंद्रीय उद्योगमंत्री पियुष गोयल यांनी याप्रकरणी तक्रार केल्यानंतर सभापती जगदीप धनखड यांनी खासदार सिंह यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई केली. केंद्र सरकार सर्व विषयांवर चर्चा करण्यास तयार असतांनाही खासदार सिंह हे राज्यसभेच्या कामकाजात अडथळा आणत होते, असं उद्योगमंत्री गोयल यांनी सांगितलं.

राज्यसभेत मणिपूरच्या मुद्द्यावर कोणत्या नियमानुसार चर्चा करायची यावर दोन्ही बाजूच्या खासदारांमध्ये मतभिन्नता होती. नियम १७६ अंतर्गत चर्चेची केंद्र सरकारची तयारी होती. मात्र, विरोधी पक्षांना नियम २६७ अंतर्गत चर्चेची मागणी होती. खासदार संजय सिंह यांच्यावरील कारवाईप्रकरणी आम आदमी पक्षानं नाराजी व्यक्त केलीय. संजय सिंह यांच्या निलंबनाविरोधात विरोधी पक्षांचे नेते राज्यसभा सभापती जगदीप धनखड यांची भेट घेणार आहेत.

Updated : 24 July 2023 6:59 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top