Home > News Update > पालघरचे खासदार राजेंद्र गावित अडचणीत

पालघरचे खासदार राजेंद्र गावित अडचणीत

पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांना पालघर प्रथम वर्ग न्यायालयाने एक वर्षांची शिक्षा आणि पावणे दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खासदार राजेंद्र गावित यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पालघरचे खासदार राजेंद्र गावित अडचणीत
X

महाविकास आघाडीच्या मंत्रीमंडळातील शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदुरबाजार न्यायालयाने दोन महिन्यांची कोठडी सुनावली आहे. हा निर्णय ताजा असतानाच पालघरच्या प्रथमवर्ग न्यायालयाने खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाच्या तुरूंगवासासह पावणेदोन कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे खासदार राजेंद्र गावित यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

पालघर येथील जमीनीच्या विकास कामासाठी देण्यात आलेला चेक न वटल्यामुळे दाखल केलेल्या प्रकरणात खासदार राजेंद्र गावित यांना पालघर येथील प्रथम वर्ग न्यायालयाने एक वर्षांच्या तुरूंगवासासह पावणेदोन कोटी रुपयांची भरपाई रक्कम भरण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर खासदार राजेंद्र गावित यांना आदेशाविरुध्द स्थगिती देण्यासह भरपाई रक्कम भरण्यास एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे.

राजेंद्र गावित काँग्रेसमध्ये असताना शहरातील साईनगर परिसरात असलेल्या एका भुखंडाचा विकास करण्यासाठी गावित यांनी एक कोटी रुपयांचा करारनामा चिराग किर्ती बाफना यांच्यासोबत 2014 मध्ये केला होता. मात्र राजेंद्र गावित यांनी हा भुखंड अन्य विकासकाला विकसीत करण्यासाठी दिला. त्यामुळे विकासकासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन झाले होते. त्याबाबच 2017 साली गावित काँग्रेस पक्षात असताना त्यांच्यावर दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्यात आला. तर 2019 मध्ये खासदार गावित यांनी बचाव न करता पैसे घेतल्याचे व करारावर सही केल्याचे मान्य केले होते. त्यानंतर या प्रकरणाची अडीच कोटी रुपयांमध्ये तडजोड झाली होती. तर त्यापैकी 1 कोटी रुपयांचा चेक वटला. मात्र उर्वरित 25 लाख रुपयांचे सहा चेक वटले नाहीत. त्यामुळे दीड कोटी रुपये रक्कमेचे चेक न वटल्याप्रकरणी 2020 मध्ये पालघर प्रथम वर्ग न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली होती.

दरम्यान 2018 मध्ये खासदार राजेंद्र गावित यांनी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. तर 2019 च्या लोकसभा निवडणूकीवेळी खासदार राजेंद्र गावित यांनी शिवसेनेत प्रवेश केला. सध्या ते शिवसेनेकडून पालघर जिल्ह्याचे खासदार आहेत. मात्र 2020 मध्ये खासदार राजेंद्र गावित यांच्याविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर त्यांनी कोरोनाचे, पावसाळी अधिवेशनाचे व आरोग्याचे कारण देत आपले म्हणणे मांडण्यास उशीर केला. तसेच आपण आदिवासी असल्याने आपल्यावर दबाव टाकून न दिशाभूल करून तडजोडीवर सही करून घेण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे या प्रकरणाच्या निकालाकडे संपुर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र पालघर प्रथम वर्ग न्यायालयाने खासदार राजेंद्र गावित यांना एक वर्षाची शिक्षा आणि पावणे दोन कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पालघर प्रथमवर्ग न्यायालयाने दिलेला निर्णय हा खासदार राजेंद्र गावित यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Updated : 14 Feb 2022 7:42 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top