मुंबईला पुढचे चार दिवस ऑरेंज अलर्ट
X
पावसाचं आगमन राज्यात उशिरा झालं असलं तरी जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने आता जोर धरला आहे. मुंबईसह कोकणात सोमवारपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. दरम्यान पुढचे चार दिवस हे मुंबईसाठी आणखी महत्त्वाचे ठरणार आहेत कारण मुंबईला चार दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मंगळवारी मुंबईत पावसाचा जोर आणखी वाढला आणि सखल भागामध्ये पाणी भरलं. यामुळे अनेक ठिकाणी रस्ते वाहतूक विस्कळीत झाली होती तर लोकल वाहतुकीवर देखील परिणाम झाला होता.
मुंबईमध्ये गेल्या 24 तासात 150 मिलीलिटर पाऊस पडला आहे. पण आता मुंबई हवामान खात्याकडून पुढील चार दिवस मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण मुंबई महानगरपालिका पूर्णपणे सज्ज असून ज्या ज्या सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं, त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने पंपाद्वारे पाणी उपसण्याचे काम सुरू आहे, मुंबईतील सर्व परिस्थितीवर महापालिकेच्या डिझास्टर कंट्रोल रूममधून विविध भागातील परिस्थिती हाताळली जात आहे आणि त्याचा आढावा देखील घेण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागाकडून देण्यात आली आहे.
दरम्यान मुंबईतील पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेतील आपत्ती निवारण विभागाला भेट दिली. तसेच कंट्रोल रूममधून मुंबईतील एकूण परिस्थितीचा आढावा घेतला. तसेच यंदा मुंबईतील रस्त्यांवर पाणी साचण्याचे प्रमाण कमी झालं आहे असं सांगत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेच्या कामाचे कौतुक देखील केले.