'मध्यप्रदेशचा व्हायरस महाराष्ट्रात घुसणार नाही; चिंता नसावी!'
X
महाविकास आघाडीने बायपास ऑपरेशन करून महाराष्ट्र वाचवलाय. मध्यप्रदेशातला वायरस महाराष्ट्रात घुसणार नाही ! चिंता नसावी, असं सूचक ट्वीट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलं आहे. मध्यप्रदेशातलं फोडाफोडीचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, असंच खासदार राऊत यांनी सूचित केलं आहे.
ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या बंडामुळे मध्यप्रदेशात राजकीय अस्थिरता निर्माण झाली आहे. कमलनाथ यांचं सरकार पाडण्यासाठी भाजपाचं वादग्रस्त ऑपरेशन लोटस कार्यान्वीत झालं आहे. लोकनियुक्त सरकारं फोडाफोडी करून पाडण्याच्या भाजपाई राजकारणावर टीका होत असली तरी एकापाठोपाठ एक राज्यात ऑपरेशनलोटसचा प्रयोग सुरूच आहे. हे लोण महाराष्ट्रात सुद्धा येऊ शकतं, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
https://twitter.com/rautsanjay61/status/1237603880625745920?s=19
महाराष्ट्रात शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी या तीन प्रमुख राजकीय पक्षांचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालेलं आहे. कधी हिंदुत्व, कधी राममंदिर तर कधी सावरकर विषय काढून भाजपा वारंवार शिवसेनेची कोंडी करण्याचा प्रयत्न करत आहे. तीन्ही पक्षात सत्तापदांवरून कोणी ना कोणी नाराज असल्याच्याही बातम्या येत असतात. त्यावर भाजपाचं फोडाफोडीचं राजकारण सर्वात होऊ शकतं, अशी चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांचं ट्वीट आलं आहे. महाराष्ट्राची 'पाॅवर' वेगळी आहे. हा राऊत यांनी भाजपाला दिलेला इशाराच मानला जातो. एक ऑपरेशन शंभर दिवसापूर्वीच फसले आहे, यांची आठवणही राऊत यांनी करून दिलीय.