'या' दिवशी होणार केवळ महिलांचे लसीकरण
महिलांचे जास्तीत जास्त कोरोना प्रतिबंधक लसीकरण व्हावे यासाठी ठाणे महापालिका प्रशासनाच्यावतीने विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात आली आहे.
X
केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार शहरात सुरु असलेल्या लसीकरण मोहिमेंतर्गत ठाणे महापालिकेने आजपर्यंत 9 लाख लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. हे करत असतानाच महिलांचेही जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी प्रत्येक महिन्याच्या चौथ्या आठवड्यातील एक दिवस पार्किंग प्लाझा येथे महिलांसाठी खास लसीकरण मोहिम ठेवण्यात येणार असून या उपक्रमाची सुरूवात येत्या सोमवार (23 ऑगस्ट) पासून करणार असल्याची माहिती महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी तयार करण्यात आलेल्या कोविशिल्ड व कोवक्सिन लसीचा डोस शासनाने दिलेल्या मार्गदर्शनानुसार देण्याचे काम महापालिका प्रशासनाच्यावतीने सुरू आहे. शासनाकडून उपलब्ध होणाऱ्या लसीकरण साठ्यानुसार महापालिका तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये नागरिकांना पाहिला व दुसरा डोस देण्यात येत आहे. लसीकरण मोहिमेत महिलांचाही जास्तीत जास्त सहभाग असावा यासाठी खास महिलांसाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लसींच्या उपलब्धतेनुसार एक दिवस पार्किंग प्लाझा येथे लसीकरण शिबीर ठेवले जाणार आहे.
अनेक गरीब व गरजू महिला या विविध ठिकाणी कामे करत असतात, तसेच अनेकांना कामानिमित्त सकाळी लवकर बाहेर पडावे लागते, त्यामुळे त्यांना लसीकरण केंद्रावर जाणे शक्य होत नाही. तसेच अनेक महिला या गर्दी असल्यामुळे लसीकरण केंद्रावर थांबत नाही. ठाणे शहरात आतापर्यत एकूण 477550 पुरूषांचे तर 423488 महिलांचे , यात गर्भवती महिला 160 तर अंथरुणाला खिळलेल्या 5 महिलांचे लसीकरण झाले आहे. लसीकरणाची ही आकडेवारी पाहता महिलांची संख्या कमी असल्याचे दिसून येते. लसीकरणामध्ये महिलांची संख्या वाढावी किंबहुना त्यांच्या लसीकरणाला गती मिळावी यासाठी खास महिलांसाठी हा उपक्रम सुरू करीत असून जास्तीत जास्त महिलांना याचा लाभ घ्यावा असे आवाहन महापौर नरेश म्हस्के व आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.