Home > News Update > बाप्पाचे विसर्जनात खड्ड्यांचा अडथळा ; गणेश भक्तांनी व्यक्त केली नाराजी

बाप्पाचे विसर्जनात खड्ड्यांचा अडथळा ; गणेश भक्तांनी व्यक्त केली नाराजी

बाप्पाचे विसर्जनात खड्ड्यांचा अडथळा ; गणेश भक्तांनी व्यक्त केली नाराजी
X

यंदा मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवलीमधील रस्त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे. महापालिका क्षेत्रातील जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच बाप्पाच्या आगमनापासून ते विसर्जनपर्यंत खड्ड्यांचा अडथळा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.

अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यांची चाळण झाली आहे. महापालिका क्षेत्रातील एकही रस्ता असा नाही की त्यावर खड्डे नाहीत असे म्हणत नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला.

दरम्यान महानगरपालिकेच्या आयुक्तांनी विसर्जना अगोदर सर्वच रस्त्याची डागडुजी करून खड्डे बुजवण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे विसर्जनापर्यंत खड्डे बुजवले जातील, अशी नागरिकांना अपेक्षा होती. मात्र ती फोल ठरली आहे. ठेकेदारांकडून आयुक्तच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याने शहरातील रस्त्यांवरील खड्डे जैसे थे आहेत.

लाडक्या गणरायाला निरोप देण्याचा दिवस. दहा दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर गणेश विसर्जनाच्या दिवशीही खड्डयातूनच बाप्पाची मिरवणूक काढावी लागल्याने गणेश भक्तांमध्ये नाराजी व्यक्त केली आहे.

पालिकेच्या हद्दीत एमएसआरडीसी व पीडब्लूडी यांच्या अखत्यारीत अनेक रस्ते आहेत. मात्र पालिका प्रशासनाने स्वत:च्याच अखत्यारीतील रस्त्यांकडे कानाडोळा केला आहे. तर एमएसआरडीसी व पीडब्ल्यूडी यांनीही त्यांच्या अखत्यारीतील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधींच्या गलथान कारभाराचा फटका बाप्पाच्या आगमन व विसर्जन मिरवणुकीलाही बसला आहे

Updated : 19 Sept 2021 8:11 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top