एकही मराठा आंदोलक उपाशी राहणार नाही; मुंबईतील डब्बेवाल्यांची ग्वाही
X
मनोज जरांगे पाटील पुण्यातून मुंबईच्या दिशेने निघालेले आहेत. लाखोंचा ताफा सोबत घेऊन ते मुंबईत दाखल होतील. मोर्चातील सर्व आंदोलकांना मराठा समाज बांधवांच्या वतीने भोजनाची व्यवस्था केली जाणार आहे. आंदोलक मुंबईमध्ये दाखल होऊन 26 जानेवारी पासुन आंदोलन सुरु झाल्यानंतर खऱ्या अर्थाने त्याचा कस लागणार आहे. मुंबई शहरातील सोयी-सुविधांवर अतिरीक्त ताण येणे हे निश्चित आहे अशा परिस्थितीत आंदोलनकर्त्यांपर्यंत जेवण पुरविणे हे एक खुप मोठे आव्हान आहे. अशा अवघड घडीला डब्बेवाला रोटी बँक पुढे सरसावली आहे. ज्या समाजबांधवांना आंदोलनकर्त्यांपर्यंत जेवण पोहचवायचे असेल परंतु गाडीची व्यवस्था नसेल तर त्यांनी डब्बेवाला रोटी बँकच्या 8424996803 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधावा. डब्बेवाल्याच्या गाडीवर ते जेवण आंदोलनकर्त्यांपर्यंत पोहचवले जाईल. वाहतुकीच्या अडचणी लक्षात घेता दक्षिण मुंबईपुरतीच ही सेवा उपलब्ध राहील.
मुंबईतील डब्बेवाला हा मराठा बांधव असून आपले काम हीच ईश्वर सेवा असं समजून तो मुंबईत सातत्याने काम करतोय. आर्थिकदृष्टया तो गरीब असून या आंदोलनात आपला ही खारीचा वाटा असावा असे त्याला वाटते, अशी भावना डब्बेवाला संघटनेचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी व्यक्त केली.
उद्यापासुन चालू होणाऱ्या आंदोलनात माझ्यासारखे असंख्य डब्बेवाले कामगार घरातून कामावर निघताना एक नाही तर दोन डब्बे घेऊन घराबाहेर पडतील. एक डब्बा मी खाईल तर दुसरा डब्बा आंदोलनातल्या मराठा बांधवाला देईल अशी सद्भावना कैलास शिंदे या डब्बेवाल्याने व्यक्त केली. कैलास शिंदे सारखे हजारो डब्बेवाले उद्या एक अधिकचा डब्बा सोबत घेऊन घराबाहेर पडतील डब्बेवाला बँकेच्या गाड्या २४ घंटे जेवण पुरवण्याची सोय करणार आहेत. ध्येय एकच कुणीही मराठा बांधव आंदोलनात उपाशी राहणार नाही, असं सुभाष तळेकर म्हणाले.