शरद पवार- प्रशांत किशोर यांच्या भेटीत काय चर्चा झाली?
X
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या दुसऱ्या भेटीनंतर राजकीय चर्चांना वेग आला आहे. सोमवारी दिल्लीमध्ये शरद पवार आणि प्रशांत किशोर यांची दुसऱ्यांदा भेट झाली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली, याची माहिती स्वत: प्रशांत किशोर यांनी दिली आहे.
मोदींविरोधात तिसरी आघाडी निर्माण करण्यासाठी या भेटीत चर्चा झाली असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता. पण प्रशांत किशोर यांनी तिसऱ्या किंवा चौथ्या आघाडीचा मोदींविरोधात उपयोग होईल असे मला वाटत नाही, असे म्हणत ती शक्यता फेटाळून लावली आहे. तसेच तिसरी आघाडी सध्याच्या राजकीय परिस्थितीत उपयुक्त ठरणार नाही, असेही त्यांनी म्हटले आहे. एनडीटीव्हीला दिलेल्य़ा मुलाखतीमध्ये प्रशांत किशोर यांनी या भेटीबाबत सविस्तर माहिती दिली आहे.
शरद पवार यांच्यासोबत आपण कधीही काम केलेले नाही, त्यामुळे आम्ही या भेटींमधून एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करतोय. या भेटीमध्ये आम्ही मोदींविरोधात लढण्यासाठी प्रत्येक राज्यातील राजकीय परिस्थिती काय याबाबत आम्ही चर्चा केली. कोणत्या राज्यात काय उपाययोजना करता येऊ शकतात, काय कमतरता आहेत यावर चर्चा झाल्याची माहिती प्रशांत किशोर यांनी दिली आहे.
प. बंगालमध्ये नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांनी मिळवलेल्या प्रचंड यशामध्ये प्रशांत किशोर यांचा वाटा आहे. या पार्श्वभूमीवर मोदीविरोधी आघाडीसाठी प्रयत्न सुरू असताना प्रशांत किशोर आणि शरद पवार यांच्या भेटीने राजकीय चर्चा सुरू झाली आहे.