केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांमधील चर्चेत तोडगा नाहीच, ५ तारखेला पुन्हा चर्चा
X
केंद्र सरकारने आणलेल्या नवीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार आणि शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींमधील चौथी बैठक तब्बल सात तास चालली. पण या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघू शकलेला नाही. ही बैठक संपल्यानंतर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी मात्र बैठक अत्यंत सकारात्मक झाली असून पुढच्या बैठकीत या वादावर सकारात्मक तोडगा निघेल, असा दावा केलेला आहे. त्याचबरोबर हमीभावाच्या मुद्द्यावर शेतकऱ्यांनी कोणतीही चिंता करू नये , हमीभावाला केंद्र सरकार धक्काही लावणार नाही, असं स्पष्ट केलेले आहे.
तब्बल सात तास चाललेल्या बैठकीनंतरही शेतकऱ्यांचे समाधान करण्यात सरकारला यश आलेले नाही. बैठकीला जाण्यापूर्वीच शेतकरी नेत्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना नवीन कृषी कायदे रद्द केल्याशिवाय माघार घेणार नाही अशी आपली भूमिका स्पष्ट केलेली होती. तसेच हे कायदे रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलवा व अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. आता पाच डिसेंबरच्या बैठकीमध्ये काही तोडगा निघतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

