Home > News Update > 3 वर्षांपासून पोलीस भरतीच्या फक्त घोषणा, अंमलबजावणी नाहीच

3 वर्षांपासून पोलीस भरतीच्या फक्त घोषणा, अंमलबजावणी नाहीच

सध्या उघड झालेल्या काही घटनांमुळे राज्य सरकारची प्रतिमा मलीन झालेली असताना आता आणखी एक आंदोलन सुरू झाले आहे. गेल्या 3 वर्षात पोलीस भरतीच न झाल्याने आक्रमक झालेल्या इच्छुक विद्यार्थ्यांनी आता आंदोलन सुरू केले आहे.

3 वर्षांपासून पोलीस भरतीच्या फक्त घोषणा, अंमलबजावणी नाहीच
X

राज्यात सध्या पोलिसांवर झालेल्या गंभीर आरोपांमुळे वातावरण तापले आहे. त्यातच आता पोलिसांच्या बदल्यांचे रॅकेट असल्याचा आरोप झाला आहे. या पार्श्वभूमीवर गुरूवारी राज्यभरात पोलीस भरतीसाठी तयारी करणारे विद्यार्थी आंदोलन करणार आहेत.

राज्यात 2018 नंतर पोलीस भरती घेण्यात आलेली नाही. पोलीस भरती घेण्यासंदर्भात गृहमंत्री व इतर मंत्र्यांकडून घोषणा खूप झाल्या आहेत, पण अजूनपर्यंत पोलीस भरतीची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. नोव्हेंबर 2019 मध्ये पोलीस भरतीची जाहिरात काढून विद्यार्थ्यांचे फॉर्म भरुन घेण्यात आले होते. पण पुढे कोणतीही प्रक्रिया राबविली गेली नाही. पोलीस भरतीची तयारी करणारे बहुसंख्य उमेदवारांची आर्थिक परिस्थिती बेताची असते, बहुसंख्य मुले ही कष्टकरी, शेतकरी, मजुरांची आहेत. ही मुले शहराच्या ठिकाणी राहून अभ्यास करतात, क्लास लावतात, पुस्तके व मेस इत्यादीचा होणारा मोठा खर्च त्यांना पेलवत नाही. ही पोलीस भरती प्रक्रिया राबवली न गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे वय वाढले आहे, विद्यार्थी नैराशात गेलेले आहेत, त्यांचे पालकसुद्धा खचून गेले आहेत.

महाराष्ट्रात कोरोनाच्या काळात MPSC ची परीक्षा घेतली जाते, आरोग्य विभागाच्या परीक्षा घेतल्या जातात, रेल्वे व इतर केंद्र सरकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात, निवडणूका घेतल्या जातात. एवढ्या सर्व बाबी राबवल्या जात असताना फक्त पोलीस भरतीच का घेतली जात नाही? असा सवाल राज्यात पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी विचारू लागले आहेत.

पोलीस भरती प्रक्रिया महाराष्ट्रामध्ये लवकरात लवकर व एकाच वेळी जाहिर केलेल्या 12 हजार 528 पदांची ही भरती प्रक्रिया राबविली जावी. ही भरती प्रक्रिया न राबविल्यास खूप मोठे आंदोलनही केले जाईल असा इशारा आता विद्यार्थ्यांनी दिला आहे. हे आंदोलन कसे असेल याची माहिती बारामतीचे पोलीस भरती मार्गदर्शक उमेश रुपनवर यांनी दिली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये दिनांक 21 मार्च ते 27 मार्च या कालावधीमध्ये सर्व मिडीया व सोशल मिडीयाच्या माध्यमातून सरकारच्या धोरणाचा निषेध केला जातोय. तसेच 25 मार्च रोजी महाराष्ट्रात पोलीस भरती न होण्यास 3 वर्षे पूर्ण होत असल्याचे प्रतिकात्मक स्वरुपात केक कापून सरकारच्या नाकर्तेपणाचा निषेध केला जाणार आहे. एवढे करूनही सरकारने पोलीस भरतीची प्रक्रिया राबवली नाही तर दुसरा टप्पा हा 28 मार्च ते 10 एप्रिल या कालावधी दरम्यान राबविला जाईल आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी कार्यालये, तहसिल कार्यालये यांना पोलीस भरती करण्याबाबतची निवेदने कोरोनाचे नियम पाळून दिली जातील. एवढे करुनही सरकारने प्रतिसाद दिला नाही तर, शेवटी तमाम पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि पालकांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र स्वरुपात आंदोलन केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Updated : 25 March 2021 11:10 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top