Covid19 : किल्ले रायगडावर पर्यटकांना नो एन्ट्री
X
रायगड : राज्यात कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या आणि Omicronचा वाढता संसर्ग यामुळे चिंता वाञली आहे. रायगड जिल्ह्यातही रोज हजारोच्या संख्येने रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे नागरिकांची व जिल्हा प्रशासनाची चिंता वाढली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले रायगडवर पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुरातत्व विभागाने बंदीचे आदेश जारी केले आहेत. किल्ले रायगडावरील रोपवेही पर्यटकांना बंद ठेवण्यात आला आहे. कोरोनाच्या या वाढत्या काळात शिवभक्त, व्यावसायिक यांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहेत.
रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव हा झपाट्याने वाढत आहे. रोज मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढत आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात 9 हजार रुग्ण संख्या आहे. जिल्ह्यात रात्रीची संचारबंदी तर दिवसा जमावबंदी लागू आहे. असे असले तरी पर्यटक आजही मोठ्या संख्येने येत आहेत. किल्ले रायगडवरही पर्यटक, शिवभक्त, अभ्यासक हे मोठ्या संख्येने येत असतात. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुरातत्व विभागाने पर्यटकांना किल्ले रायगडावर येण्यास बंदी घातली आहे. पुढील आदेश येईपर्यंत ही बंदी कायम राहणार आहे. त्यामुळे पर्यटकांचा तसेच स्थानिक व्यावसायिकांचा हिरमोड झाला आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे काळजी घेणे गरजेचे असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे