राज्यपालांच्या हस्ते 'डॉक्टरेट' चे वाटप नाही :राजभवनाकडून खुलासा
X
'राजभवन येथे राज्यपालांच्या हस्ते बोगस डॉक्टरेटचे वाटप' या मथळ्याखाली दैनिक सामनाने प्रकाशित केलेले (दि. २१) वृत्त गैरसमज करणारे आहे. राजभवनात ८ नोव्हेंबर २०२१ रोजी महात्मा गांधी पीस फाउंडेशन या ओडिशातील एका संस्थेने कार्यक्रम आयोजित केला होता असे वृत्तात म्हटले आहे. मात्र त्या दिवशी राजभवन येथे झालेल्या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण (से. सं) या संस्थेने केले होते.
सदर संस्थेचे समादेशक श्री मनिलाल शिंपी यांनी राज्यपालांना दिनांक २५ ऑगस्ट २०२१ रोजी पत्र पाठविले होते. त्यामध्ये कोविडच्या काळात प्रशासनाला आणि पोलीस विभागाला सहकार्य करणाऱ्या आर.एस.पी. युनिटचे शिक्षक, अधिकारी व समाजसेवक यांचा राज्यपालांनी सत्कार करावा अशी विनंती केली होती.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ही विनंती मान्य करून दिनांक ८ नोव्हेंबर २०२१ रोजी सकाळी ११ वाजता राजभवन येथे कोविड योद्ध्यांचा सत्कार करण्यास अनुमती दिली होती. आयोजकांचे विनंती पत्र आणि मा. राज्यपालांची अनुमती कळविणारे राज्यपालांच्या प्रधान सचिवांचे पत्र सोबत जोडले आहे. त्यामुळे कार्यक्रमाचे आयोजक महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण (से. सं) ही संस्था होती हे स्पष्ट होते.
या पत्रामध्ये महात्मा गांधी पीस फाउंडेशन या संस्थेचा किंवा पीएच.डी. प्रदान करण्याच्या कार्यक्रमाचा कुठेही उल्लेख नाही. दिनांक ८ नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये राज्यपालांनी केवळ कोविड योद्ध्यांचा सन्मान केला. कुणालाही पीएच.डी. किंवा डॉक्टरेट प्रदान केली नाही.
आयोजकांनी ऐनवेळी परवानगी नसताना महात्मा गांधी पीस फाउंडेशन या संस्थेचे नाव कार्यक्रमाच्या बॅनरवर छापले. तथापि, मा. राज्यपाल कार्यक्रमाला उपस्थित असेपर्यंत त्यांच्या हस्ते पीएच.डी. अथवा डॉक्टरेट कुणालाही देण्यात आली नाही. राज्यपालांचे सभास्थानावरून प्रस्थान झाल्यानंतर आणि त्यांच्या अनुमतीशिवाय आयोजकांनी परस्पर डॉक्टरेट प्रदान केल्या गेल्या किंवा कसे यासंदर्भात महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल व नागरी संरक्षण या आयोजक संस्थेकडे विचारणा करण्यात येत असल्याचे राजभवनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.