पुण्यात तूर्तास शाळा बंद करण्याचा निर्णय नाही, महापौरांनी केले स्पष्ट
X
पुणे : राज्यात कोरोना रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर या शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात काल कोरोनाचे 524 नवे रुग्ण आढळून आले होते. तसंच 36 ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे.या पार्श्वभूमीवर आज महापौर मुरलीधर मोहोळ आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. पुण्यात तूर्तास तरी शाळा बंदचा निर्णय घेतला नसल्याचं महापौरांनी स्पष्ट केलं. तसंच पालकमंत्र्यांसोबतच्या बैठकीनंतर नव्या निर्बंधांबाबत निर्णय होईल, असंही महापौर म्हणालेत.
सध्या राज्यात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे सर्वच संबंधित प्रशासन सतर्क झाले असून आवश्यक त्या उपाययोजना केल्या जात आहेत. मुंबईत 1 ली ते 9 वि आणि 11वीचे वर्ग बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.याच पार्श्वभूमीवर पुण्यात काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.मात्र महापौर मोहोळ यांनी तूर्तास तरी असा निर्णय घेणार नसल्याचे म्हटले आहे.
27 डिसेंबरपासून ते कालपर्यंत पुण्यात रुग्णसंख्या अडीच हजारापर्यंत पोहोचली आहे. महापालिकेमध्ये आज कोरोना आढावा बैठक घेण्यात आली. रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी रुग्णांमध्ये तीव्र लक्षणं नाहीत. ओमिक्रॉनचे 27 रुग्ण आहेत. यात दोन्ही डोस घेतलेले 70 ते 75 टक्के लोक आहेत. त्यामुळे रुग्ण दाखल होण्याचे प्रमाण कमी आहे. सध्या 80 रुग्ण ऑक्सिजनवर आहेत, असं महापौरांनी सांगितलं.
मात्र, सध्या पुण्यात मुबलक औषधांचा साठा आहे. 4 हजार रेमडिसिव्हर आहेत. तसंच 1 हजार 800 बेड आता महापालिकेकडे आहेत. 12 ऑक्सिजन प्लांट आहेत. सूचना मिळाली. तर 7 दिवसांच्या आत जम्बो रुग्णालय सुरू करु शकतो. जम्बो रुग्णालयाची पूर्ण तयारी झाल्याचंही महापौर म्हणालेत.