नाव न घेता नितीन गडकरींचा गोदी मीडियाला टोला
X
मुंबई – विरोधी पक्षांकडून गोदी मीडियाचा वारंवार उल्लेख केला जातो. मात्र, केंद्र सरकारमधील ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी गोदी मीडियाचं नाव न घेता टोला लगावलाय. महाराष्ट्रातील पत्रकारिता इतर ठिकाणच्या तुलनेत गुणात्मक असल्याचे गौरवोद्गार गडकरी यांनी काढले.
मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं पत्रकारितेत उल्लेखनिय कार्य करणाऱ्या पत्रकारांना सन २०२२ साठीच्या पूरस्कारांचं आज मुंबईत वितरण करण्यात आलं. यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी गडकरींनी पत्रकारितेच्या विविध अंगाना स्पर्श करणारं भाषण केलं. त्याच ओघात गडकरींनी गोदी मीडियाचं नाव न घेता देशात सुरू असलेल्या पत्रकारितेवर भाष्य केलं. गडकरी म्हणाले, “ सध्या इतर ठिकाणी जी पत्रकारिता सुरू आहे, त्याबाबत न बोललेलंच बरं. पण महाराष्ट्रातली पत्रकारिता ही गुणात्कम असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रतिकूल परिस्थितीतही पत्रकारांनी व्रतस्थाप्रमाणे पत्रकारिता सुरू ठेवली असल्याचंही गडकरी यावेळी म्हणाले. त्याचप्रमाणे पत्रकारांना पुरस्कार देऊन त्यांचा उत्साह वाढविणाऱ्या मराठी पत्रकार परिषदेचंही गडकरींनी यावेळी कौतुक केलं.
ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना “दर्पणकार” बाळशास्त्री जांभेकर जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. तर ज्येष्ठ पत्रकार बापू ठाकूर यांना भगवंतराव इंगळे स्मृती पुस्कार, दैनिक लोकमतच्या कोल्हापूर आवृत्तीचे संपादक वसंत भोसले यांना आचार्य अत्रे पुरस्कार, ज्येष्ठ पत्रकार स. सो. खंडाळकर यांना नागोरावजी दुधगावकर पुरस्कार, न्यूज १८ लोकमतचे निवेदक मिलिंद भागवत यांना शशिकात सांडभोर स्मृती पुस्कार, दैनिक सकाळचे प्रतिनिधी मारुती कंदळे यांना प्रमोद भागवत शोध पत्रकारिता पुरस्कार, पत्रकार जे. डी. पराडकर यांना रावसाहेब गोगटे स्मृती पुस्कार, न्यूज १८ लोकमतचे रायगड प्रतिनिधी मोहन जाधव यांना स्व. दत्ताजीराव तटकरे स्मृती पुस्कार तर मॅक्स वूमनच्या संपादक प्रियदर्शिनी हिंगे यांना सावित्रीबाई फुले स्मृती पुरस्कारानं गौरविण्यात आलं.