हरिद्वार धर्म संसदः अशा गोष्टींना महत्त्व देऊ नकाः गडकरी
X
गेल्या काही दिवसात देशात दोन ठिकाणी झालेल्या धर्मसंसद वादात अडकल्या आहेत. या धर्मसंसदेच्या व्यासपीठावरुन प्रक्षोभक आणि चिथावणीखोर भाषणं केली गेली. यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. या प्रकरणी कायदा आपलं काम करेल, आपण सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे आणि आपल्यामुळे कुणाच्याही भावना दुखावता कामा नये. तसंच अशा बाबींना महत्त्व देता कामा नये.
यावेळी गडकरी यांनी स्वामी विवेकानंद यांचे उदाहरण दिले. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील भाषणात हिंदू धर्म सहिष्णुतेवर आधारित असून हिंदू धर्म हा विस्तारवादी नाही आणि हिंदू धर्म सर्वांचं भलं व्हावं या विचाराचा आहे. असं म्हटलं होतं. आम्ही सर्वांना सोबत घेऊन जाणार आहोत. 'सबका साथ सबका विकास और सबका विश्वास' हाच आमचा भाव असल्याचं मत गडकरी यांनी व्यक्त केलं आहे. ते NDTV शी बोलत होते.
काय आहे प्रकरण?
कट्टर हिन्दुत्ववादी नेता यति नरसिम्हानंद यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्य़ा प्रमाणात व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये नरसिम्हानंद मुस्लीम समाजाविरोधाक हिंसा करण्याचं अपील हिंदूना करत होते. हरिद्वार येथे पार पडलेल्या तीन दिवसीय सम्मेलनात मुस्लीम समाजाविरोधात हिंसा करण्याची अपील नरसिम्हानंद यांनी केलं आहे. देशातच नाही तर विदेशात देखील हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर उत्तराखंड पोलिसांनी वसीम रिज़वी उर्फ जितेंद्र नारायण त्यागी सह इतर लोकांवर गुन्हा दाखल केला.
वसीम रिज़वी हे उत्तर प्रदेश सेंट्रल शिया वक़्फ़ बोर्ड चे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी मुस्लीम धर्म सोडून हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. या सर्व प्रकरणावर गडकरी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. दरम्यान या सर्व प्रकरणानंतर देशातील ७६ नामांकित वकिलांनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एनवी रमण्णा यांना पत्र लिहिलं आहे.