..म्हणून राणेंचे टेन्शन वाढले
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान झालेल्या संतोष परब यांच्यावरील हल्लाप्रकरणी अटकेत असलेल्या नितेश राणे यांचे टेन्शन वाढले आहे.
X
सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणूकीदरम्यान शिवसेना नेते सतिश सावंत यांचे सोशल मीडियाप्रमुख संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे अटकेत आहेत. मात्र नितेश राणे यांची तब्बेत बिघडल्याने त्यांना उपचारासाठी कोल्हापुरला रवाना करण्यात आले. मात्र नितेश राणे यांच्या जामीनावर लांबलेली सुनावणी आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे राणेंचे टेन्शन वाढले आहे.
संतोष परब हल्ला प्रकरणी आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलासा देण्यास नकार दिल्यानंतर नितेश राणे यांना अटक करण्यात आली. तर 4 फेब्रुवारीपर्यंत त्यांना पोलिस कोठडी ठोठावण्यात आली होती. मात्र त्यानंतर न्यायालयाने 18 फेब्रुवारीपर्यंत नितेश राणे यांना न्यायालयीन कोठडी सुनावली. दरम्यान सोमवारी नितेश राणे यांच्या जामीनावर सुनावणी होणार होती. मात्र लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्य सरकारने सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. त्यामुळे नितेश राणे यांच्या जामीनाची सुनावणी लांबणीवर पडली. तर नितेश राणे यांच्या जामीनावर आता मंगळवारी सुनावणी होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयातही नितेश राणे यांचे निकटवर्तीय असलेले आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष गोट्या सावंत यांचा जामीन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला. दरम्यान नितेश राणे यांना कोठडीत असताना छातीत दुखू लागल्याने वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना कोल्हापुरला हलवण्यात आले. तर गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला हा राणे यांना मोठा धक्का मानला जातो. आमदार नितेश राणे यांच्या जामीनावर होणारी सुनावणी लांबल्यामुळे आणि गोट्या सावंत यांचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायलयाने फेटाळला आहे. त्यामुळे राणेंच्या टेन्शनमध्ये वाढ झाली आहे.