Home > News Update > नितेश राणे म्हणाले, समीर वानखेडे काय 'दाऊद' आहे का?, मलिकांनी साक्षात 'दाऊद' शोधला

नितेश राणे म्हणाले, समीर वानखेडे काय 'दाऊद' आहे का?, मलिकांनी साक्षात 'दाऊद' शोधला

नितेश राणे म्हणाले, समीर वानखेडे काय दाऊद  आहे का?, मलिकांनी साक्षात दाऊद शोधला
X

सध्या आर्यन खान केस प्रकरणावरुन महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यामध्ये जोरदार चर्चा रंगताना दिसत आहे. नवाब मलिक दररोज नवनवीन माहिती मांडत असल्यामुळं या प्रकरणात एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखडे अडचणीत आल्याचे दिसत आहे.

आता या प्रकरणात नवाब मलिक यांना संजय राऊत यांनी देखील पाठींबा देत या सर्व प्रकरणात महाविकास आघाडी सरकारने आक्रमक भूमिका घ्यावी. असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं आहे. सरकार पाडण्यासाठी काही लोकं गांजा मारून काम करत असले तरी आम्ही शुद्धीत आहोत. हा पकडलेला गांजा असतो एनसीबी त्यांना पुरवत असेल आणि त्या गांजाच्या नशेत कोणी सरकार पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर नशेत ते पडतील सरकार पडणार नाही, असा टोला संजय राऊत यांनी लगावला होता. याला भाजप नेते नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

समीर वानखेडेला कोणीही काही करू शकत नाही, करायची हिंमत असेल तर करून दाखवा. पुढचा कार्यक्रम आम्ही करू असा इशारा नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.

भाजपाकडून सचिन वाझेवर कारवाई करण्याची मागणी केली असता, ते काय ओसमा-बीन-लादेन आहे का? असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला होता? आता आम्ही म्हणतोय की, वानखेडे काय दाऊद इब्राहिम आहे का? असा सवाल आम्ही विचारतोय. अशा शब्दात नितेश राणे यांनी महाविकास आघाडी सरकार वर टीका केली होती. टिकेला उत्तर देताना आता नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचं एक प्रमाणपत्र ट्वीट केलं आहे. या ट्वीट मध्ये समीर वानखेडे यांचे नाव 'समीर दाऊद वानखेडे' असं लिहिण्यात आलं आहे.

एकंदरीत नवाब मलिक यांनी ट्वीट केलेल्या कथित जन्म प्रमाणपत्रानुसार समीर दाऊद वानखेडे हे जन्माने मुस्लिम आहेत, परंतु ते नागरी सेवा परीक्षेला आरक्षित श्रेणीत बसले आणि आयआरएस झाले.

दरम्यान या प्रकरणात केंद्र सरकार काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे. अंमली पदार्थ प्रकरणी क्रूझ पार्टीत अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतर आरोपींना पकडण्यात आल्यानंतर आर्यन खानसोबतचा सेल्फी काढल्याने किरण गोसावी चर्चेत आला. आता किरण गोसावीच्या खासगी बॉडीगार्ड प्रभाकर साईलनं एका व्हिडिओद्वारे धक्कादायक माहिती दिली आहे.

क्रूझवरील छाप्यावेळी २ ऑक्टोबरला काय घडलं. त्यावेळी आपणही किरण गोसावीसोबत होतो, असा दावाही त्याने केला आहे. प्रभाकर साईल हा अंमली पदार्थप्रकरणी क्रमांक १ चा साक्षीदार आहे.

Updated : 25 Oct 2021 11:37 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top