आपल्या वयोवृध्द आईसाठी डॉ. तात्याराव लहानेंची भावूक पोस्ट...!
X
प्रसिध्द नेत्रतज्ञ पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने हे काल दि. 02-05-2024 (गुरुवार) रोजी आपल्या पुतण्याच्या लग्नानिमित्त सहपत्नी लातूरला गेले होते. लग्नसोहळा पार पडल्यानंतर डॉ. तातेराव लहाने व डॉ. विठ्ठल लहाने हे माकेगावला गेले होते जिथे त्यांची सफरचंदाची फलबाग आहे. दुपारचे जेवण झाल्यानंतर २ च्या सुमारास उन्हाचा पारा चढलेला असताना देखील त्यांनी सफरचंद व पेरूच्या बागेत चक्कर टाकली. काही दिवसांपूर्वीच झालेल्या अवकाळी पावसामुळे सफरचंदाच्या झाडांना लागलेले सफरचंद तोडून खाल्ले. त्यानंतर डॉ. लहाने पेरूच्या बागेत फिरले मात्र पेरूचा बहर आताच लागला असल्यामुळे त्यांना पेरु खाण्याचा आनंद घेता आला नाही, असं ते म्हणाले.
आपल्या आईबद्दल काय म्हणाले डॉ. लहाने ?
माकेगाव येथील आपल्या सफरचंदाच्या बागेतून डॉ. लहाने हे लातूरला आल्यानंतर आपल्या आईला(अंजनाबाई लहाने) भेटले. यावेळी त्यांच्या माईच्या आरोग्याविषयी बोलताना डॉ. लहाने म्हणाले की, मायीचे दोन्ही फ्रॅक्चर्स आता भरली आहेत. पण माय झोपून झोपून अशक्त झाली आहे. पण मायीचा उत्साह मात्र तेवढाच आहे. चार पाच तासात मायीने तिच्या कडे असलेल्या खुप गोष्टी सांगितल्या. जेवण्याची वेळ झाल्यामुळे डॅा. विठ्ठलनी मायीला गप्पा मारत मारत स्वत: जेऊ घातले.
यावेळी त्यांच्या माईने परिवारातल्या सर्वांची विचारपुस केली. त्यांना आशिर्वाद दिले. डॉ. विठ्ठल, डॉ. कल्पना, डॉ. प्रसाद, गया, शुकेशनी व भागिरथी हे मायीची काळजी घेत असतात. माय म्हणजे प्रेमाचा अखंड झरा असुन आमच्या सर्व कुटुंबाला एकत्र बांधुन ठेवणारी ती एकच शक्ती आहे. मायीने कुटूंबासाठी फारच कष्ट घेतले आहेत, असं डॉ. लहाने यावेळी म्हणाले.
त्यानंतर मायीचा आशिर्वाद घेउन डॉ. लहाने परत मुंबईला निघाले. मायीला भेटलं कि तिच्यापासुन काम करण्याची खुप प्रेरणा मिळते. पुन्हा पंधरा दिवसानी तीला भेटण्यासाठी पाय लातूरकडे वळतात. माय ऊठुन पुन्हा चालावी यासाठी त्यांनी देवाकडे प्रार्थणा केली.