Home > News Update > डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान न माननाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज - नाना पटोले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान न माननाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज - नाना पटोले

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान न माननाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज -  नाना पटोले
X

देशात २०१४ साली भारतीय जनता पक्षाचे सरकार आले आणि त्यांनी त्यांचे खरे रंग दाखवायला सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानाने माणसाला माणसासारखं जगण्याचा हक्क दिला पण भाजपा संविधानच मानत नाही, भाजपाचे नेते सातत्याने डॉ. बाबासाहेबांचे संविधान बदलण्याची भाषा जाहीरपणे करत असतात. संविधान हा जगातील सर्वात पवित्र ग्रंथ आहे हा पवित्र ग्रंथ न माननाऱ्यांना व तो बदलू पाहणाऱ्या भाजपाला आता धडा शिकवण्याची गरज आहे, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिला आहे.

वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेल्या संविधान सन्मान महासभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले बोलत होते, यावेळी व्यासपीठावर वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांच्यासह आघाडीचे नेते उपस्थित होते. ते पुढे म्हणाले की, काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांना वंचितचे अध्यक्ष ॲड. बाळासाहे आंबेडकर यांनी या संविधान सन्मान महासभेचे आमंत्रण दिले होते पण विधानसभा निवडणुकींचा प्रचार अंतिम टप्प्यात असल्याने ते उपस्थित राहू शकले नाहीत, त्यांनी तसे पत्रही प्रकाश आंबेडकर यांना दिले असून राहुल गांधी यांनी वंचितच्या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आहेत. आपण राहुल गांधी यांचा प्रतिनिधी म्हणून उपस्थित आहे. जे लोक संविधान तोडण्याचे काम करतात त्यांच्या विरोधात व जे लोक संविधानाच्या रक्षणासाठी एकत्र येतात त्यांना काँग्रेसचा पाठिंबा आहे. संविधान बदलण्याची भाषा करणाऱ्यांच्या विरोधात आता संविधानाला माननाऱ्यांनी एक वज्रमुठ करण्याची गरज आहे. भाजपा सरकारची निती ही ब्रिटीश शासनाप्रमाणे ‘फोडा आणि राज्य करा’ अशी आहे पण शाहु, फुले, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात हे चालू देणार नाही.

नरेंद्र मोदींचे सरकार केंद्रात आल्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आखलेले आर्थिक धोरण बदलण्यात आले. हे सरकार सर्वसामान्य जनता व गरिबांकडून जीएसटीच्या माध्यमातून पैसे वसूल करते व तेचे पैसे नरेंद्र मोदी मुठभर उद्योगपती मित्रांना देतात, त्यांचे खिसे भरतात. मोदी सरकारच्या या धोरणाला विरोध करुन मी खासदारीचा राजीनामा दिला. जीएसटीच्या पैशात धनदांडग्यांचा नाही तर गरिब लोकांचा, शेतकरी व सर्वसामान्य जनतेचा हक्क आहे तो त्यांना मिळाला पाहिजे ही आमची भूमिका आहे.

आज राज्यात आरक्षणावरून सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे, त्याला भाजपाच जबाबदार आहे. केंद्रात व राज्यात सरकार आले तर आरक्षण देण्याचे आश्वासन भाजपाने दिले होते पण ९.५ वर्ष झाली आता मोदी सरकारचे काऊंडटाऊन सुरु झाले पण आरक्षण दिले नाही. भाजपा सरकार खाजगीकरण करत सुटले आहे, खाजगीकरण केले तर आरक्षण राहणार आहे का? आणि आरक्षण संपले तर आपल्याला काय शिल्लक राहणार आहे? मोदी सरकारमध्ये आरएसएसच्या मुलांना थेट सचिव पदावर नियुक्त केले जाते, हे बहुजन समाजातील मुलांसाठी चिंताजनक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी शिक्षण घेण्याचा संदेश दिला पण हे भाजपाचे सरकार जिल्हा परिषदांच्या शाळाही बंद करत आहेत. राज्यात १.२५ लाख शिक्षकांची पदे रिक्त आहेत. शिक्षण व आरोग्य हा आपला हक्क आहे पण तेही मिळत नाही, असे नाना पटोले म्हणाले.

या सभेला काँग्रेसचे प्रदेश सरचिटणिस देवानंद पवार व प्रवक्ते डॉ. राजू वाघमारे हेही उपस्थित होते.

Updated : 25 Nov 2023 3:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top