भाई एन. डी. पाटील पुरोगामी परंपरेचे एक तेजस्वी दीपस्तंभ : माकप
X
भाई एन. डी. पाटील हे महाराष्ट्राच्या पुरोगामी परंपरेचे एक तेजस्वी दीपस्तंभ होते. स्वातंत्र्य चळवळ, संयुक्त महाराष्ट्र चळवळ, सीमा चळवळ, शेतकरी चळवळ आणि शिक्षण प्रसाराची चळवळ या सर्वांत त्यांचे अतिशय मोलाचे योगदान होते, अशी प्रतिक्रीया माकपने दिली आहे.
१९४८ साली शेतकरी कामगार पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि अखेरपर्यंत ते त्या पक्षाशी व डाव्या चळवळीशी एकनिष्ठ राहिले. अनेक वर्षे त्यांनी शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीसपद भूषविले. महाराष्ट्राच्या समग्र डाव्या व पुरोगामी चळवळीचे ते सर्वमान्य नेते होते. मार्क्स, फुले, सावित्रीबाई, शाहू, आंबेडकर, विठ्ठल रामजी शिंदे आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुरोगामी वारसा त्यांनी प्रचंड ताकदीने पुढे नेला.
१९७२-७३च्या भीषण दुष्काळाविरुद्धचे आंदोलन, त्यात इस्लामपूर आणि वैरागच्या गोळीबारात झालेले शेतकरी हुतात्मे, आणीबाणीविरोधी लढा, एन्रॉन विरुद्धचे आंदोलन, महामुंबई एसईझेड विरुद्धचा लढा, कोल्हापूरचे टोल विरोधी आंदोलन, आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या धर्मांध शक्तींनी केलेल्या हत्येच्या सखोल व जलद तपासासाठीची मोहीम, या व इतर अनेक जनआंदोलनांत भाई एन. डी. पाटील यांचा सिंहाचा वाटा राहिला.
भाई एन. डी. पाटील हे १९५९ साली वयाच्या २९व्या वर्षी प्रथम महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. ते विधान परिषदेवर तीनदा आणि विधान सभेवर एकदा निवडून आले. १९७८ ते १९८० या पुलोद सरकारच्या काळात ते महाराष्ट्राचे सहकार मंत्री होते. त्या काळात कापूस एकाधिकार खरेदी योजना आणि रोजगार हमी योजना उत्कृष्टपणे राबविण्यात भाई एन. डी. पाटील आणि भाई गणपतराव देशमुख या शेकापच्या मंत्रीद्वयांचे फार मोठे योगदान होते.
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी स्थापन केलेल्या रयत शिक्षण संस्थेचे भाई एन. डी. पाटील अनेक वर्षे चेअरमन होते. गोरगरीब समाजातील बहुजन, दलित, आदिवासी, अल्पसंख्याक आणि मुलींमध्ये शिक्षणाचा विस्तार करण्यासाठी त्यांनी अनेक धडक योजना राबविल्या.
भाई एन. डी. पाटील यांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती, शिक्षण अशा अनेक विषयांवर प्रगल्भ लेखन केले. महाराष्ट्रातील अनेक पुरोगामी संस्थांचे ते अध्यक्ष अथवा पदाधिकारी होते. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या आज झालेल्या महाराष्ट्र राज्य सचिवमंडळाच्या बैठकीने भाई एन. डी. पाटील यांना भावपूर्ण आदरांजली वाहिली, त्यांच्या पत्नी व इतर सर्व कुटुंबियांचे मनःपूर्वक सांत्वन केले, आणि ज्या तत्त्वांसाठी ते गेली ९३व्या वर्षापर्यंत लढत राहिले ती जास्त जोमाने पुढे नेण्याचा निर्धार केला, असे माकपने प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे. नरसय्या आडम, महाराष्ट्र राज्य सचिव, डॉ. अशोक ढवळे केंद्रीय कमिटी सदस्य मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष यांच्या पत्रकारवर सह्या आहेत.