महिलांची फसवणूक केली म्हणून केंद्र सरकार गुन्हा दाखल करायला हवा- चाकणकर
X
राज्यात वाढत्या गॅस दराच्या विरोधात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या महिला आघाडीने आंदोलन केले.राज्यात ठिकठिकाणी केलेल्या आंदोलनादरम्यान राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पोस्टाने शेणाच्या गोवऱ्या पाठवण्यात आल्या आणि जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले.
पुण्यातील समाधान चौक राष्ट्रवादी महिला काँग्रेस प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली गॅस दरवाढीच्या विरोधात आंदोलन करण्यात आले यावेळी बोलताना चाकणकर यांनी मोदी सरकारवर जोरदार निशाणा साधला.
यावेळी 'अक्कड बक्कड बंबे बो... पेट्रोल हो गया पुरा 100' अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या. यावेळी बोलताना चाकणकर म्हणाल्या की, राष्ट्रीय उज्वला गॅस योजनेबाबत पंतप्रधान मोदींनी मोठी घोषणा केली आणि 5 कोटी महिल्यांच्या डोळ्यातील अश्रू पुसण्याचे आश्वासन दिलं, मात्र राष्ट्रीय कौटुंबिक सर्व्हेनुसार ही योजना पूर्णपणे फसली असल्याचे समोर आलं आहे. सोबतच केंद्र सरकारकडून 98 टक्के महिलांपर्यंत ही योजना पोहोचवल्याचा दावा केला जात आहे, मात्र सरकारची ही योजना केवळ 20 टक्के महिलांपर्यंतच देखील पोहचलेली नाही असं चाकणकर यांनी म्हटले आहे.
केंद्र सरकारने कायम या देशातील जनतेची दिशाभूल केल्याचे म्हणत देशातील सर्वाधिक फसवी योजना कोणती असेल तर ती उज्वला गॅस योजना आहे, त्यामुळे आम्हा महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी केंद्र सरकारवर गुन्हा दाखल करायला हवा असं चाकणकर म्हणाल्या