Home > News Update > शेतकऱ्यांना 'साले' म्हणणाऱ्यांचे विधान घराघरात पोचवा- जयंत पाटील

शेतकऱ्यांना 'साले' म्हणणाऱ्यांचे विधान घराघरात पोचवा- जयंत पाटील

शेतकऱ्यांना साले म्हणणाऱ्यांचे विधान घराघरात पोचवा- जयंत पाटील
X

जालना : 'मोदी सरकारने परदेशातून तेल आयात केल्याने शेतकऱ्यांच्या सोयाबीनला भाव मिळत नाही. मुळात भाजप नेहमीच शेतकऱ्यांच्या विरोधात राहिला आहे, असा आरोप करत याच मतदारसंघातील भाजप नेते रावसाहेब दानवे हे शेतकऱ्यांना 'साले' बोलले होते. त्यांचं हे विधान घराघरात पोचवा', असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता संवाद यात्रेदरम्यान ते बोलत होते.

दरम्यान यावेळी बोलताना ते म्हणाले की, एक वेळ असा होता की आपल्या पक्षात कोणी थांबत नव्हतं. आज मात्र त्यांना पश्चाताप होत आहे की राष्ट्रवादीत थांबायला हवं होतं. आपण पडत्या काळात पक्षासोबत होतात आजही आहात याबद्दल भोकरदनवासियांचे धन्यवाद, असं पाटील म्हणाले.

सोबतच 2024 ला आपल्या अंगावर गुलाल पाडायचा असेल तर पक्षाचा विस्तार करा. जे पक्ष सोडून गेले आणि पुन्हा माघारी येऊ इच्छित आहेत अशांना देखील सोबत घ्या, निवडणुकीच्या मतमोजणीचा दिवस डोक्यात ठेवून काम करा. 2024 ला गुलाल राष्ट्रवादी काँग्रेसचाच असायला हवा, असं पाटील म्हणाले.

दरम्यान यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, भाजप ओबीसी आरक्षणाबाबत धादांत खोटा प्रचार करत आहे. ओबीसी समाजाच्या एकाही जागेला धक्का लागता कामा नये याची खबरदारी महाराष्ट्र सरकार घेत आहे. सोबतच जालना जिल्ह्याचा विकास करण्यासाठी संपूर्ण शासन काम करत आहे. यावेळी चंद्रकांत दानवे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.

Updated : 25 Sep 2021 4:00 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top