कुठल्या पवारासोबत राष्ट्रवादीचे आमदार
X
तनाने शरद(shard pawar) पवारांसोबत मनाने अजित पवारांसोबत (Ajit pawar)अशी स्थिती काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची झाली आहे. अजित पवार यांच्या सोबत राजभवनावर शपथविधीसाठी गेलेल्या आमदारांना अवघ्या काही वेळातच शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर वर यायला भाग पाडलं.
जवळपास 41 आमदारांनी थेट येऊन बैठकीत भाग घेतला तर बाकीचे 10 आमदार रात्री उशिरा शरद पवारांच्या संपर्कात आले. शरद पवारांनी आपली संपूर्ण ताकद पणाला लावून पक्ष एकसंध असल्याचं चित्र काल तयार केलं असलं असलं तरी सुद्धा अनेक आमदार अजूनही अजित पवारांच्या संपर्कात आहेत.
हे ही वाचा...
शिवसेना इन ऍक्शन
बहुमताची चाचणी लगेच घ्या – कपिल सिब्बल
राज्यपालांनी पक्षीय भूमिका घेतली आहे – असीम सरोदे
अजित पवार यांनी घेतलेला निर्णय तडकाफडकी असला तरी ते असा निर्णय घेतील अशी शक्यता अनेक आमदारांना वाटत होती. मात्र या निर्णयामागे शरद पवारच असू शकतात, आणि त्यांच्या आदेशाशिवाय दादा असं काही करू शकत नाहीत असा ठाम विश्वास असल्याने अनेक आमदार कालच्या बैठकांना फार्स मानून चालत होते.
मात्र, हा फार्स नसून खरोखरच अजित पवारांनी बंड केलेलं आहे, आणि याला शरद पवारांचा छुपा पाठींबा नाही हे समजल्यावर अनेक आमदार गोंधळात पडले. दादांनी सत्तेत असताना सर्वपक्षीय आमदारांची कामं करून त्यांना मदत केलेली आहे, धडाडीने कामं करण्याचा दादांच्या कामांचा अनुभव यामुळे राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेते सोडले तर इतर सर्व आमदारांना अजित पवारांबद्दल सहानुभूती आहे.
अजित पवार यांच्या कालच्या निर्णयाबद्दल आमदारांमध्ये असलेल्या गोंधळामुळे बहुतांश आमदारांनी शरद पवार यांच्या मागे आपण ठामपणे उभे असल्याचं स्पष्ट केलं. तरी सुद्धा जवळपास सर्व आमदार अजित पवारांच्या संपर्कात होते. आज सकाळी ही अजित पवार त्यांच्या नरिमन पॉइंट इथल्या निवासस्थानी परतले. त्यानंतर शरद पवारांच्या ताब्यात असलेल्या राष्ट्रवादीच्या अनेक आमदारांनी अजित पवारांशी फोनवरून संपर्क ही साधला आहे. त्यामुळे पवार विरूद्ध पवार या संघर्षात नेमकं कुणाचा विजय होईल हे शेवटच्या क्षणापर्यंत रंगणार आहे.