इतरांना तुरुंगात पाठवणाऱ्या अधिकाऱ्याला तुरुंगात जाण्याची भीती वाटते- नवाब मलिक
X
मुंबई : आर्यन खान आणि इतर दोघांना न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, क्रूझ ड्रग्ज प्रकरण फर्जीवाडा आहे, वास्तविक खालच्या कोर्टातच आर्यन खान आणि इतरांना जामीन मिळू शकत होता, मात्र NCB ने बाजू मांडताना नेहमीच वेगवेगळा युक्तिवाद केला, लोकांना जास्तीत जास्त काळ तुरुंगात ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.असं मलिक यांनी म्हटले आहे. सोबतच जो माणूस इतरांना तुरुंगात पाठवतो त्यालाच तुरुंगात जाण्याची भीती वाटत आहे, म्हणून त्यांना अटक करण्याआधी 72 तास कळवावे असं सांगण्यात आलं असल्याचे म्हणत त्यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर टीका केली. दरम्यान हे संपूर्ण प्रकरण बोगस आहे आणि ते हळूहळू बाहेर येत आहे असं त्यांनी म्हटले. त्याचबरोबर ज्या समीर वानखेडेंनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे संरक्षणाची मागणी केली होती तेच आता आपली चौकशी मुंबई पोलिसांऐवजी सीबीआयकडे देण्याची मागणी करत आहेत यावरून स्पष्ट होते की हे सर्व प्रकरण फर्जीवाडा आहे आणि ते समोर येण्याची भिती त्यांना वाटत आहे असं मलिक म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी NCB चे अधिकारी समीर वानखेडे यांचे रेव्ह पार्टीच्या मुख्य आयोजकाशी काय संबंध आहेत, असा प्रश्न मलिक यांनी विचारला आहे.
क्रुझवर रेव्ह पार्टी होणार होती असा दावा एनसीबीने केला होता.मग या पार्टीचा मुख्य आयोजक काशिफ खान आणि समीर वानखेडे यांचा काय संबंध आहे? आजपर्यंत त्या दाढीवाल्यावर कुठलीही कारवाई का नाही?, याची उत्तरं समीर वानखेडे यांच्याकडून अपेक्षित आहेत, असं मलिक यांनी म्हटलं आहे.