Home > News Update > पंडित नेहरूंच्या स्मृतीदिनी अटलबिहारी वाजपेयी यांचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांची भाजपला चिमटे

पंडित नेहरूंच्या स्मृतीदिनी अटलबिहारी वाजपेयी यांचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांची भाजपला चिमटे

पंडित नेहरूंच्या स्मृतीदिनी अटलबिहारी वाजपेयी यांचा व्हिडीओ शेअर करत जयंत पाटलांची भाजपला चिमटे
X

आज स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी आहे. त्या निमित्ताने त्यांना देशभरातून श्रद्धांजली अर्पण केली जात आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी देखील पंडीत नेहरुंना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

गेल्या काही वर्षांत पंडीत जवाहरलाल नेहरू यांच्या बदनामीची एक शिस्तबद्ध मोहीम या देशात एका विशिष्ट वर्गाकडून चालवली जात आहे. मात्र, या वर्गाकडून पंडित नेहरूंची उंची कितीही कमी करायचा प्रयत्न केला, तरीही ती कमी होणार नाही. पंडित जवाहरलाल नेहरू यांचा कायमच या देशामध्ये सन्मान होत राहिला व यापुढेही होत राहील. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

मात्र, या भावना व्यक्त करताना देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांचा व्हिडीओ जयंत पाटील यांनी शेअर केला आहे.

हा व्हिडीओ शेअर करत पाटील यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

या व्हिडीओमध्ये अटल बिहारी वाजपेयी म्हणतात... "भय व भूकमुक्त जगाचे एक स्वप्न उध्वस्त झाले असून, भारत माता आज शोकाने भरून गेली आहे, भारत मातेने तिचा आवडता राजकुमार आज गमावला आहे. जागतिक शांततेचा पुरस्कार करणारा संरक्षक आता आपल्यात नाही. सूर्यास्त झाला असून आपल्याला आपला रस्ता शोधायला हवा. जरी आमच्यामध्ये मतभेद असले तरीही आम्हाला पंडितजींची आदर्श मूल्ये, देशाप्रतीचे प्रेम आणि असीम धैर्याबद्दल केवळ आदरच आहे"

ही आठवण जयंत पाटील यांनी करुन देताना भाजपाला चिमटा काढला आहे. १९९९ सालीच्या अविश्वास ठरावाच्या वेळी देखील पंडित नेहरू यांचा गौरवपूर्ण उल्लेख अटलबिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात केला होता. ते भाषण सोबत व्हिडिओ स्वरूपात आहे. यातूनच पंडित नेहरूंची महानता लक्षात येते असेही जयंत पाटील म्हणाले.

पंडित नेहरू यांनी कायमच आपल्या विरोधी विचारांचा आदर केला. तसेच लोकशाही मूल्यांना कधीही तडा जाऊ न देता संसदेला सर्वोच्च मानलं. स्वतंत्र भारताची पायाभरणी पंडित नेहरू यांनीच केली. ते एक व्यक्ती म्हणून, स्वातंत्र्यसैनिक म्हणून तर महान होतेच पण या देशाचे पहिले पंतप्रधान म्हणून या देशाच्या उभारणीत सर्वोच्च वाटा पंडित नेहरूंचा आहे. हे सांगतानाच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मृतीदिनानिमित्त जयंत पाटील यांनी अभिवादन केले आहे.

Updated : 27 May 2021 10:35 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top