ईडीची नोटीस आल्याचे खडसेंकडून मान्य, आता प्रतीक्षा सीडीची !
X
जळगाव - भाजपातून नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेले माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी अखेर ईडीने नोटीस बजावल्याचे मान्य केले आहे. या नोटीशीनंतर लोकांकडून आपल्याला खूप फोन आले याचाच अर्थ लोकांची सहानुभूती आपल्यासोबत आहे असा दावा खडसेंनी केला आहे. पुण्यातील भोसरी येथील भूखंड गैरव्यवहार प्रकरणात ईडीने एकनाथ खडसे यांना नोटीस बजावली असून, चौकशीसाठी बुधवारी (30 डिसेंबर) हजर राहण्याचे आदेश दिल्याची माहिती मिळतेय. पण या माहितीला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
भोसरीतील भूखंड खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने ईडीने खडसेंना नोटीस बजावल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणी खडसेंची चौकशी होण्याची शक्यता आहे. शुक्रवारी नोटीशीचे उत्तर आल्यानंतर खडसे यांनी आपल्याला कोणतीही नोटीस आली नसल्याचे म्हटले होते. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला तेव्हा खडसेंनी माझ्या मागे ईडी लावली तर मी सीडी लावेल असा इशारा दिला होता. त्यानंतर ही सीडी नेमकी कुणाची अशीही चर्चाही सुरू झाली होती. जळगाव जिल्ह्यात एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन हा संघर्ष असल्याने खडसेंचा रोख गिरीश महाजन यांच्याकडे होता का असा सवालही उपस्थित होत आहे.
दरम्यान गिरीश महाजन यांच्याविरोधात काही दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झाल्यानंतर सत्ताधारी सूडाचे राजकारण करत असल्याचा आरोप गिरीश महाजन यांनी केला होता. महाजन यांचा रोख खडसेंकडे होता, अशी चर्चा होती. आता खडसेंनी राष्ट्रवादीत प्रवेश करताच त्यांना ईडीची नोटीस येण्याचे नेमके कारण काय अशी चर्चाही सुरू झाली आहे.