Home > News Update > राष्ट्रवादीचा नवाब मलिक यांना दणका

राष्ट्रवादीचा नवाब मलिक यांना दणका

राज्याचे कौशल्यविकास मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. त्यानंतर विरोधकांकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांना मोठा दणका दिला आहे.

राष्ट्रवादीचा नवाब मलिक यांना दणका
X

राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री नवाब मलिक यांच्याविरोधात मनी लाँडरिंगप्रकरणी गुन्हा दाखल करून ईडीने अटक केली आहे. तर नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी व्यवहार केल्याचा आरोप करत भाजपकडून मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यापार्श्वभुमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक पार पडली. त्यामध्ये नवाब मलिक यांच्याकडील मंत्रीपदाचा कारभार काढून घेण्यात आला आहे. त्यामुळे मलिक बिनखात्याचे मंत्री झाले आहेत. तर हा राष्ट्रवादीने मलिक यांना मोठा दणका दिला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने मलिक यांच्याकडून राजीनामा घेतला नसला तरी त्यांच्याकडील सर्व खात्यांचा पदभार काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे. तर मलिक यांच्याकडील अल्पसंख्यांक विकास मंत्रीपदाचा कार्यभार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. तसेच नवाब मलिक यांच्याकडे असलेला कौशल्यविकास मंत्री आणि रोजगार हे खाते राज्याचे आरोग्य आणि कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांच्याकडे देण्यात आला आहे. याबरोबरच नवाब मलिक पालकमंत्री असलेल्या परभणी आणि गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारीही काढून घेण्यात आली आहे. त्यापैकी गोंदिया जिल्ह्याची जबाबदारी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे तर परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना अटक झाल्याने त्यांचे घर फिरले असतानाच आता सर्व खात्यांचा पदभार काढून घेतल्याने त्यांच्या घराचे वासेही फिरायला लागल्याचे चित्र आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसने नवाब मलिक यांच्याकडील सर्व खात्यांचा कारभार काढून घेतल्याचे स्पष्टीकरण देतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले, नवाब मलिक यांचा जामीन पुन्हा फेटाळण्यात आला आहे. त्यामुळे जो पर्यंत नवाब मलिक उपलब्ध होत नाहीत. तोपर्यंत त्यांच्याकडे असलेल्या सर्व पदांची जबाबदारी इतरांकडे देण्याचे ठरवले आहे. मात्र आम्ही नवाब मलिक यांचा राजीनामा घेणार नसल्याचा पुनरुच्चार जयंत पाटील यांनी केला.

नवाब मलिक यांना पक्षसंघटनेतूनही डच्चू

नवाब मलिक यांचा जामीन फेटाळल्यामुळे त्यांच्याकडील सर्व खात्यांचा कारभार काढून घेण्यात आला असतानाच मलिक यांच्याकडे असलेली मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारीही राष्ट्रवादीने काढून घेतली. तर सध्या नरेंद्र राणे आणि राखी जाधव या कार्याध्यक्ष म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणूकीत मलिक यांच्या अटकेचा फटका बसू नये, यासाठी त्यांच्याकडील पदांचा कार्यभार काढून घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

जयंत पाटील यांनी सांगितले की, मलिक यांच्याकडे असलेले पालकमंत्रीपदाचा कार्यभार प्राजक्त तनपुरे आणि धनंजय मुंडे यांच्याकडे तर मंत्रीपदाचा कार्यभार जितेंद्र आव्हाड आणि राजेश टोपे यांच्याकडे सुपुर्द करण्याबाबत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीणार आहे.

या निर्णयामुळे विरोधी पक्षांनी घेतलेल्या आक्रमक भुमिकेची तीव्रता कमी करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न आहे का? याबरोबरच राष्ट्रवादीने घेतलेल्या या निर्णयामुळे राष्ट्रवादी बॅकफुटवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Updated : 18 March 2022 9:13 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top