Home > News Update > अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ED कडून अटक,

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ED कडून अटक,

अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ED कडून अटक,
X

राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर ED ने अटक केली आहे. नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं होतं. अखेर आठ तासांच्या चौकशीनंतर नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे.

जुन्या मालमत्ता व्यवहार प्रकरणी नवाब मलिक यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी)कडून चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे. प्राप्त माहितीनुसार पहाटेच ईडीचं पथक नवाब मलिक यांच्या घरी धडकलं होतं. त्यानंतर सकाळी सात वाजेपासून नवाब मलिक यांची ईडी कार्यालयात अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू होती. ``देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून केंद्रीय तपास यंत्रणा राज्यात कारवाई करतात. ईडीचे लोक कसे भेटतात, कशी चौकशी करतात हे आम्हाला माहिती आहे. वेळ आल्यावर आम्ही माहिती बाहेर काढू" असा इशारा नवाब मलिक यांनी या अगोदर दिला होता.

तर, आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा भाऊ इक्बाल कासकर याला विशेष न्यायालयाने शुक्रवारी २४ फेब्रुवारीपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाची (ईडी) कोठडी सुनावलेली आहे. त्यानंतर आता ईडीच्या रडारवर नवाब मलिक आले आहेत.


मंत्री नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डसोबत संबंध आहेत, असा आरोप 9 नोव्हेंबर 2021 रोजी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. मलिकांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीकडून जमीन खरेदी केलीय. या जमिनी मुंबई बॉम्ब स्फोटातील आरोपींच्या आहेत. मलिकांचे सरदार शाह वली खान आणि हसीना पारकर यांच्या जवळचा सलीम पटेलसोबत व्यावसायिक संबंध आहेत. या दोघांनी मलिकांच्या नातेवाईकांच्या एका कंपनीला मुंबईतील एलबीएस रोडवरची कोट्यवधींची जमीन कवडीमोल किमतीने विकलीय, असा आरोप फडणवीस यांनी केला होता.

अटकेनंतर नवाब मलिकांना सरकारी जेजे इस्पितळात वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आलं. तिथून त्यांना ED च्या कोर्टापुढे कोठडीसाठी उभं करण्यात येणार आहे.


Updated : 23 Feb 2022 5:58 PM IST
Tags:    
Next Story
Share it
Top