Nashik Bus Fire : नाशिक दुर्घटनाग्रस्तांना मुख्यमंत्र्यांसह पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केली मदत
शनिवारी पहाटे नाशिक येथे झालेल्या दुर्घटनेत मृत झालेल्यांच्या कुटूंबियांना पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्र्यांनी मदत जाहीर केली.
X
नाशिक येथे खासगी बसला आग लागून 11 लोकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रस्तामार्गे दुर्घटनाग्रस्तांची भेट घेण्यासाठी गेले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करून म्हटले की, नाशिक येथे झालेल्या भीषण बस अपघातात ११ नागरिकांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. ही घटना अतिशय दुर्दैवी आणि मन सुन्न करणारी असून या घटनेमागील कारणांचा शोध घेतला जाईल. दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली. तसेच या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना ५ लाख रुपयांची मदत शासनाच्या वतीने जाहीर करण्यात आली आहे. तसेच जखमींवर शासकीय खर्चाने उपचार करण्यात येत आहेत, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही नाशिक दुर्घटनेतील नागरिकांच्या नातेवाईकांना मदत जाहीर केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून या दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत देण्यात येण्याचे जाहीर केले आहे. तसेच जखमींना पीएम केअर्स फंडाच्या माध्यमातून 50 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
हे ही वाचा- नाशिकमध्ये खासगी बसला आग, मृतांची संख्या 11, आकडा वाढण्याची भीती
छगन भुजबळ यांनी घेतली दुर्घटनाग्रस्तांची भेट घेत अपघातग्रस्तांची विचारपूस केली. तसेच या अपघातामध्ये 11 जणांचा झालेला मृत्यू दुर्दैवी असल्याचेही छगन भुजबळ म्हणाले. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री काही वेळात नाशिकला पोहचणार असल्याचे म्हटले आहे. तसेच ज्या ठिकाणी अपघात झाला. त्या ठिकाणी नेहमीच अपघात होत असतील तर त्यासाठी उपाययोजना कराव्यात, असं मत छगन भुजबळ यांनी व्यक्त केले.