गुलाबी थंडीत रंगला नंदुरबारात भजी महोत्सव...
X
थंडीला सुरवात होवून जरी एक महिना लोटला असला तरी थंडीच्या दिवसात गरमा-गरम भजी आणि चहा पिण्याची जी मजा असते ती काही औरच...सध्या नंदूरबार जिल्ह्यात थंडीच्या पार्श्वभूमीवर भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
सध्या देशभरासह राज्यात आणि नंदुरबार शहरात गुलाबी थंडी पडलेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे थंडीत शेकोटी घेत त्यासोबत गरमा-गरम चहा आणि भजीची प्लेट मिळाली तर किती बरे होईल, असा विचार नंदूरबार करत असतील तर त्यांच्यासाठी भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याच गुलाबी थंडीचे निमित्त साधत लोक वेगवेगळ्या प्रकारच्या व्यजंनावर ताव मारताना दिसून येतात. नंदुरबार येथील हुतात्मा शिरीष कुमार गार्डनमध्ये खास थंडीत भजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या भजी महोत्सवाला नंदुरबारकरांनी सुद्धा चांगला प्रतिसाद दिला आहे.
या भजी महोत्सावामध्ये विविध प्रकारचे २९ भजी विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. गुलाबी थंडीत नंदुरबारकरांनी यावेळी गरमागरम भजीचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे ६० रुपयात पोट भरून भजीचे मेजवानी नंदुरबारकरांना यावेळी आकर्षित करत होती. शहरात पहिल्यांदाच अशा प्रकारे खाद्यपदार्थांचा महोत्सव आयोजित झाल्याने नागरिकांनीही त्याला चांगला प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले.