हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा कट शिजतोय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा गंभीर आरोप
X
मुंबई ड्रग्स प्रकरणात अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह इतरआरोपींना NCB ने अटक केली. या प्रकरणावरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे NCB अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करत असताना दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणावरून भाजपवर गंभीर आरोप केला आहे. हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाचा कट शिजत असल्याचा आरोप पटोले यांनी केला आहे.
NCB ज्या प्रकारे हे प्रकरण हाताळत आहे, त्यावरुन निश्चितपणे 'दाल मे कुछ काला है'. एका मोठ्या कलाकाराच्या मुलाच्या विरोधात षडयंत्र करुन हिंदू-मुस्लिम वाद निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचा गंभीर आरोप पटोले यांनी केला आहे. नाना पटोले यांच्या या वक्तव्यामुळे या प्रकरणाला वेगळंच वळण मिळण्याची शक्यता आहे. पटोले यांच्या या आरोपांवर भाजप नेते काय उत्तर देतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे.
NCB च्या कारवाईबद्दल पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पटोले म्हणाले की, कायद्यापेक्षा कोणीही मोठे नाही, जे चुकीचे करतील त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे.मात्र अदानी मुंद्रा बंदरावर 3 हजार किलो अंमली पदार्थ सापडले त्याचे काय झाले? त्याच्यावर काहीच कारवाई केली जात नाही. आपल्या उद्योगपती मित्रांना वाचवण्यासाठी व अदानी मुंद्रा बंदरावर सापडलेल्या अंमलपदार्थ प्रकारणावरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी मुंबईत कारवाई केल्याचे दाखवले जात आहे. मुंबईतील NCBच्या कारवाया म्हणजे 'दाल मे कुछ काला है…' असे वाटते. असं पटोले यांनी म्हटले आहे.