गृहमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर नागपूर पोलीस दल अॅक्शनमोडमध्ये ; 100 गुन्हेगारांना घेतलं ताब्यात
X
नागपूर : महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गेल्या आठवड्यात नागपूरच्या दौऱ्यावर होते. दिलीप वळसे पाटील यांच्या दौऱ्यानंतर नागपूर पोलीस दल अॅक्शनमोडमध्ये आलेलं पाहायला मिळत आहे. पोलिसांनी आठवडाभरात गुन्हेगारांविरोधात तीन मोठ्या कारवाई करत 100 गुन्हेगारांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये क्रिकेट बुकी, अमली पदार्थ, अवैध शस्र विरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
गृहमंत्री दिलीप वळले पाटील यांनी गेल्या आठवड्यात नागपुरातील गुन्हेगारीचा आढावा घेतला होता, त्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी क्रिकेट बुकी विरोधात मोठी मोहिम राबवली. भारत-पाकिस्तान टी ट्विटी सामन्यावर कोट्यावधींच्या सट्ट्यादरम्यान पोलिसांनी 19 ठिकाणी छापेमारी केली. यात अनेकांना ताब्यात घेतलं, त्यानंतर अमली पदार्थ विक्रेत्यांवर धडक कारवाई केली. यात सहा तासांत पोलिसांनी तब्बल 66 आरोपींना जेरबंद केलं. आणि एक लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
एकीकडे मुंबईत NCB च्या कारवाईवरुन अमली पदार्थ तस्करीचा मुद्दा गाजत आहे, तर इकडे नागपूर पोलिसांनी अमली पदार्थाविरोधात धडक कारवाई सुरु केली आहे. त्यानंतर नागपूर पोलिसांनी आपला मोर्चा अवैध शस्त्र वापरणाऱ्यांकडे वळवला. या मोहिमेत 30 गुन्हे दाखल झाले असून, 31 गुन्हेगारांकडे धारदार शस्रे आढळली. दिवाळीच्या काळात नागपूरातील गुन्हेगारी वाढू नये, म्हणून पोलिसांनी ही कारवाई केल्याचे नागपूर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.