लखीमपूर हिंसाचार, ११ ऑक्टोबरला सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्र बंदची हाक
X
उ. प्रदेशातील लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडण्यात आल्याचे घटनेचे तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. आता या घटनेचा निषेध करण्यासाठी राज्यात सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंद पुकारण्यात आल्याची माहिती जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली आहे. हा बंद महाविकास आघाडी सरकारकडून म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेकडून पुकारण्यात आल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे.
लखीमपूर इथल्या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकार आणि योगी सरकारवर जोरदार टीका केली होती. तसेच काँग्रेस राहुल गांधी आणि प्रियंका गांधी देखील या मुद्द्यावरुन आक्रमक झाले आहेत. हे दोघेही बहिण भाऊ आता लखीमपूरकडे रवाना झाले आहेत.
उ. प्रदेशातील लखीमपूरमध्ये आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशीष मिश्रा याने गाडीने उडवल्याचा आरोप होतो आहे. या घटनेत चार शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी आशीष मिश्रांविरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी त्यांना अजून अटक झालेली नाही.