महापालिकेच्या 'तेजस्विनी' अडकल्या रजिस्ट्रेशनच्या फेऱ्यात
X
कल्याण : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातील महिला प्रवाशाना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी शासनाच्या निधीतून पालिकेच्या परिवहन विभागाने 27 आसनी पिवळ्या रंगाच्या 4 बसेस खरेदी केल्या आहेत. या बसेस 15 ऑगस्टपासून महिला प्रवाशांच्या सेवेसाठी चालवल्या जाणार असल्याचे पालिकेच्या परिवहन विभागाकडून सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप या बसेस रजिस्ट्रेशनच्या प्रक्रियेत अडकल्याने बसेसची प्रतीक्षा संपलेली नाही.
याबाबत मनसे आमदार राजू पाटील यांनी अजूनही या बसेस रस्त्यावर उतरविण्यात आलेल्या नसून पालकमंत्र्यांना बसेसचे उद्घाटन करण्यास वेळ मिळत नसल्याने महिला प्रवाशांना वेठीस धरले जात असल्याचा आरोप केला आहे.
राज्य शासनाकडून राज्यातील 6 महापालिकांना तेजस्विनी बसेससाठी प्रत्येकी 1 कोटी 20 लाखाचा निधी वर्ग करण्यात आला होता. या निधीतून जानेवारी 2021 मध्ये केडीएमटीने पिवळ्या रंगाच्या 27 आसनी तेजस्विनी बसेस खरेदी केल्या असून या बसेसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, एलईडी डिस्प्ले, सीटमध्ये पुरेशी आरामदायक स्पेस, प्रत्येक सीट स्वतंत्र, पुढे आणि मागे चालकाच्या नियंत्रणात असलेले दरवाजे, स्थानकाच्या सूचना देण्यासाठी स्पिकर यासारख्या अत्याधुनिक सुविधा बसविण्यात आल्या आहेत. या बसेससाठी वाहक म्हणून काम करणाऱ्या 15 महिला वाहकांना प्रशिक्षण देण्यात आले असून सकाळी 7 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या वेळात या बसेस चालविण्याचे वेळापत्रक तयार करण्यात आले आहे.
तर ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दाखल झालेल्या या बसेसचे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर स्वातंत्र्य दिन म्हणजेच 15 ऑगस्ट पासून प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार होत्या .मात्र अद्याप या बसेसना मुहूर्त मिळालेला नसल्याने महिला वर्ग व मनसे आमदार राजू पाटील आक्रमक झाले आहेत. बसेस सेवेत दाखल झालेल्या असल्या तरी या बसच्या उद्घाटनासाठी पालकमंत्र्याना वेळ नसल्यामुळे या बसेस रखडल्या असून आणखी किती काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे व इतर बस सारख्या या बसेस ही धूळखात राहणार आहे का ? असा सवाल संतप्त महिला व ट्विटरच्या माध्यमातून ट्विट करत मनसे आमदार राजू पाटील त्यांनी प्रशासनाला केला आहे. तर याबाबत परिवहन व्यवस्थापक डॉ. दीपक सावंत यांना विचारले असता , त्यांनी आरटीओकडून अद्याप या बसेसचे रजिस्ट्रेशन पूर्ण झालेले नसल्यामुळे या बसेस सुरु करता आलेल्या नसून लवकरात ही प्रक्रिया पूर्ण करत आयुक्तांकडून या बसेस चालविण्यासाठी मान्यता घेऊन या बसेस रस्त्यावर उतरविल्या जातील असे सांगितले.