कोरोना पश्चात मुंबईत वाहन गर्दी : आर्थिक सर्वेक्षणातून उघड
X
कोणतंही नैसर्गिक आपत्ती चांगल्या बरोबर वाईटाला घेऊन येते. कोरोना आणि लॉकडाऊनच्या काळात सार्वजनिक व्यवस्था बंद असल्याने संसर्गाच्या भीतीने लोकांनी स्वतःची वाहनं खरेदी करण्याचा सपाटा वाढवल्याचे आर्थिक सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. एकट्या मुंबई शहराचा विचार केला तर सध्या मुंबईत 40 लाख वाहने आहेत. राज्यातल्या एकूण वाहन नोंदणीपैकी सर्वात मोठा वाटा म्हणजे 10.3 टक्के नोंदणी फक्त मुंबई शहरात आहे.
विशेष म्हणजे यापूर्वी केवळ पुण्याची मक्तेदारी असलेल्या मुंबई आता दुचाकी वाहनांची संख्याही मागील वर्षी 3 टक्क्यां वाढली. ज्यामुळे मुंबईतील दुचाकी वाहनांची संख्या 23.6 लाखांवर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 12.8 लाख हलकी मोटार वाहने आहेत. यातील तब्बल 11 लाख ही खासगी वाहनं असल्याचं आर्थिक सर्वेक्षणात उघड झालं आहे.
मुंबई हे महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या घनतेचा शहर असून मुंबईतील लोकसंख्या जशी जशी वाढत आहे. त्याचसोबत मुंबईतील वाहनांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्याच्या आर्थिक सर्वेक्षणात मुंबईत इतर राज्याच्या तुलनेत 10 टक्क्यांपेक्षा जास्त वाहनांची नोंदणी होत असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे मुंबईत भेडसावणारी वाहतूक कोंडी आणि प्रदूषण ही समस्या यातून निर्माण झाली आहे.
मुंबईतील वेगाने वाढणारा वाहतूक नोंदणीचा दर ही भविष्यातील धोक्याची घंटा असून यामुळे शहरातील समस्येमध्ये भर पडणार आहे. मुंबईतील वाहतूक सुरळीत करण्यासाठी दोनच पर्याय असू शकतात. ज्यामध्ये मुंबईतील पार्किंगची समस्या सोडवावी लागेल आणि दुसरी म्हणजे मुंबईतील सार्वजनिक बस वाहतुकीसाठी एक लेन राखीव ठेवावी. त्याचसोबत वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी रस्त्यांवरील बसेसची वारंवारता वाढवावी, असं वाहतूक आणि परिवहन तज्ज्ञ अशोक दातार यांनी सांगितलं. भविष्यात येऊ घातलेले मेट्रो प्रकल्प देखील वाहतूक समस्या दूर करण्याचा मार्ग नाही. त्यासाठी नियोजन आणि राजकीय इच्छाशक्तीच बळ लागेल असं दातार यांचं म्हणणं आहे.
मुंबईत वाहनांची घनता प्रत्येक चौरस किलोमीटरमध्ये दोन हजारापर्यंत पोहोचली आहे. त्यात वाहनांची संख्या वाढल्याने याचा परिणाम रस्त्यांवर येत्या काळात रस्त्यावर प्रत्यक्ष दिसणार आहे. मुंबईतील सध्याची जीवघेणी वाहतूक कोंडी, रस्त्यांची अवस्था आणि मोठ्या प्रमाणात निर्माणाधिन असलेल्या कामांमुळे मुंबईकर त्रस्त आहे.
त्यात सार्वजनिक वाहतुकीचीही वानवा आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षात मुंबईतील रस्त्यांवर रहदारी वाढेल आणि त्याचा परिणाम रस्ते वाहतुकीवरही दिसेल असं वाहतूकतद्न्यांचं म्हणणं आहे.