दोन संशयित व्यक्तीने टॅक्सी चालकाला विचारला मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता, सुरक्षा वाढवली
दोन संशयित व्यक्तीने टॅक्सी चालकाला विचारला मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता, सुरक्षा वाढवली
X
आशिया खंडातील सर्वात मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. सोमवारी एका टॅक्सी चालकाने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून 2 लोक अँटिलियाच्या बाहेर माहिती गोळा करत असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर मुंबई पोलिसांनी हे पाऊल उचललं आहे.
टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीनुसार त्या अज्ञात व्यक्तीच्या हातात एक मोठी बॅग होती. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांच्या पथकाने या टॅक्सी चालकाची चौकशी केली. याशिवाय, टॅक्सी चालकाला ज्या ठिकाणाहून अँटिलियाचा पत्ता विचारला गेला होता, त्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही पोलीस तपासत आहेत.
टॅक्सी चालकाने दिलेल्या माहितीनुसार सीएसटी स्टेशनजवळ किल्ला कोर्टासमोर दोन व्यक्तींनी टॅक्सी ड्रायव्हरला मुकेश अंबानी यांच्या अँटिलियाचा पत्ता विचारला होता. अंबानी यांच्या घराचा पत्ता विचारल्यावर हा टॅक्सी ड्रायव्हर जरा अवाक् झाला आणि त्याने या दोन व्यक्तींचे चेहरे काळजीपूर्वक पाहिले.
या प्रकरणाचे गांभीर्य पाहून टॅक्सी चालकाने तातडीने मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन केला. ही माहिती कळताच अधिकाऱ्यांनी ही माहिती तात्काळ मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांना दिली. पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनी या प्रकरणाची तात्काळ चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले. यासोबतच मुकेश अंबानी यांच्या घरातील अँटिलियाची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. अँटिलियाच्या आसपासच्या ठिकाणीही संशयास्पद वाहनांची झडती घेतली जात आहे.
दरम्यान मुंबईमध्ये प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर 25 फेब्रुवारीला स्फोटकांनी भरलेली एक कार सापडली होती. या स्फोटक कार प्रकरणामागे मुंबई पोलिस दलातील अधिकारी सचिन वाझे असल्याची बाब समोर आली होती.