मुंबई-गोवा महामार्ग समन्वय समितीच्या जन आंदोलनाला पाठींब्याची गरज: संतोष येडगे
X
कोकणातील आगामी गणेशोत्सव सणानिमित्त येणाऱ्या चाकरमान्यांना मुंबई गोवा महामार्गावरील टोलनाके बांधून तयार झाले आहेत. परंतु महामार्गाचे रखडलेले काम आणि खड्ड्यांचा काम न झाल्यानं चाकरमान्यांवर पैसे भरुन त्रास सहन करण्याची वेळ आली आहे.
महामार्ग चौपदरीकरण कामाच्या दिरंगाई आणि खड्ड्यांमुळे त्रस्त झालेल्या कोकणातील सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी संघटीत होऊन महामार्ग समन्वय समिती स्थापन केली. जन आंदोलनाची हाक दिली आहे. ९ ऑगस्ट क्रांती दिनी चिपळूण बहादुर शेख नाका या ठिकाणी काळ्या फिती बांधून निषेध आंदोलनचा इशारा आता सरकारला दिला आहे.
संजय यादवराव, अॅड. ओवेस पेचकर यासारख्या मंडळींच्या पुढाकारातून उभे राहत असलेल्या या आंदोलनात कोकणातील नागरीकांनी आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवावा असे आवाहन सामाजिक कार्यकर्ते संतोष येडगे यांनी केले आहे.
मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाची चर्चा जोरात सुरू आहे. मात्र, खड्ड्याचं काय? मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र. ६६ चे चौपदरीकरण एनएचएआय आणि राज्य पीडब्ल्यूडी यांनी केले आहे. एकूण ४५० कि.मी. मार्गापैकी सध्या २३० कि.मी.चे काम पूर्ण झाले आहे. साधारण ४३ टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम पूर्ण होण्यास पुढील वर्षअखेर उजाडणार आहे. त्यानंतरच महामार्गाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
पनवेल ते झारापपर्यंतच्या महामार्गाचे २३०.७१ कि.मी. काम डिसेंबर २०२० पर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित काम मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे लक्ष्य आहे. आरवली ते वाकेड या टप्प्यावरील काम पूर्ण होण्यास २०२२ चा डिसेंबर महिना उजाडेल. हे काम पूर्णत्वास नेण्यासाठी या प्रकल्पाचा सतत आढावा घेण्यात येत आहे, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री गडकरींनी वारंवार देत आहेत.
आरवली ते कांटे या ४० कि.मी. मधील ८.६१ टक्के टक्के तर कांटे ते वाकेड या ५०.९०० कि.मी. मधील १२ टक्के काम पूर्ण झाले आहे. काम अपुर्णतेमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील प्रवाशांना अनेक ठिकाणी खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. तर दुचाकी स्वारांमध्ये मणक्याचे आजार वाढू लागले आहेत. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत काम पुर्ण करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.